Ticker

6/recent/ticker-posts

कर्तव्यदक्ष व सामाजिकता जोपासणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची परवड

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- पोलिस दल शिस्तप्रिय दल असला तरी कालपरत्वे या दलातही चाटूकार अधिकाऱ्यांची फौज निर्माण झाली असून कर्तव्य सोडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची जीहुजुरी करण्यात धन्यता मानीत असल्यामुळे सामाजिकता जोपासणाऱ्या व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना अडगळीत टाकून त्यांचे मनोधर्य खच्ची करण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकाराने मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहे. या प्रकाराला कंटाळून अनेक कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यावर मात करण्यासाठी समाजाने कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांना संरक्षण पुरविणे गरजेचे झाले आहे. 
              "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ महाराष्ट्र पोलिस सज्जनांचे रक्षण व दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यासाठी कटिबद्ध आहेत. असा होत असला तरी राजकारणाचा पोलिस दलात शिरकाव झाला असून गुन्हेगारांचे इशाऱ्यांवर नाचवित असतात. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे गॉडफादर असल्यामुळे त्यांचे हातून कितीही चुका झाल्या तरी कारवाई होत नाही. त्यामुळे ते अधिनस्त पोलिस अधिकाऱ्यांना आपल्या पद्धतीने चालविण्याचा प्रयत्न करतात. या प्रकाराने कर्तव्याचा विसर पडतो. यास कर्तव्यदक्ष अधिकारी तयार होत नाहीत. त्यांचेवर वरिष्ठांचे आदेश पालन न करण्याचा ठपका ठेवून कारवाई केली जाते. 
              जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी आले. त्यांनी लोक सहभागातून अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रमाणित प्रयत्न केला. युवकांना पोलिस, अर्धसैनिक बल, सैन्यभरतीत सहकार्य व्हावे. या करिता पोलिस ठाण्याचे हद्दीत आवश्यक प्रशिक्षण व पेपर विषयी माहिती देणे सुरू केले. काही पोलिस अधिकाऱ्यांनी अवैध व्यवसायिकांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी लघु व्यवसायास अर्थसाहाय्य केले. किरकोळ प्रकरणे आपसी समझोत्याने मार्गी लावली. गंभीर आजारी रुग्णांस मार्गदर्शन करून उपचारासाठी मदत केली. समाजाचे आपण काही देणे लागतो यासाठी रोग निदान शिबिर, रक्तदान शिबिराचे आयोजन केले. अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शैक्षणिक बाबींचा खर्चही उचलला. 
               सामाजिकता जोपासणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांचे अल्पावधीतच इतरत्र स्थानांतरण करण्यात आले किंवा किरकोळ चुकांचा बाहू करून शिस्तीचे गोंडस नावाखाली त्यांना अडगळीत टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. काहींना हे सहन झाले नाही. त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. उशिरा का होईना. त्यांना न्याय मिळणार असला तरी पोलिस दलात कर्तव्यदक्ष व सामाजिकता जोपासणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यास अडगळीत टाकले जाते म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह शासनास विचार मंथन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या