Ticker

6/recent/ticker-posts

अमळनेर एस.टी. आगार व्यवस्थापनाचा मनमानी कारभारपुरेसे प्रवासी असूनही एस.टी. बंद करून तांदळीकरांचे हाल.


पंकज पाटील चित्रा न्युज 

जळगाव- अमळनेर आगार यांच्या मनमानी व बेजबाबदार कारभारामुळे अमळनेर तालुक्यातील निम मार्गे तांदळीला येणाऱ्या दोन एस.टी. बसेसच्या फेऱ्या अचानक बंद करण्यात आलेल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या 20 वर्षापासून अमळनेर ते तांदळी निम मार्गे एस.टी. बस सुरु होती. या गाड्या सकाळी अमळनेरहून 9 वाजता तर दुपारी 1 वाजता नियमित जनरल स्वरुपात सुरु होती आणि या गाड्या अनुक्रमे सकाळी 10 वाजता तर दुपारी 2 वाजता तांदळीला येत असते. सकाळची 10 वाजेची गाडी तर तांदळीलाच अर्धी भरून जात असे शेजारच्या तालुक्यातील पढावद, भिलाणे येथील प्रवासीही अमळनेरला जाण्यासाठी तांदळी गाडीतूनच जात असत. असे असताना 20 वर्षापासून नियमित व जनरल स्वरुपाच्या अशा या दोन्ही गाड्या आगार व्यवस्थापकांनी पुरेसे प्रवासी असतांनाही अचानक बंद केल्या.
      यावर तांदळीच्या ग्रामस्थांनी त्यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता ह्या गाड्या केवळ विद्यार्थ्यांसाठी असून कदाचित शाळा सुरु झाल्यावर त्या सुरु करण्याचा विचार करण्यात येईल असे उडवाउडवीचे उत्तर  देत असतात. एवढेच काय ग्रामस्थांनी त्यांना ठिय्या आंदोलन किंवा 'रास्ता रोको' चा विचार बोलून दाखविला असता, तुम्हाला पाहिजे ते करा, याचा आमच्या वर कसलाही परिणाम होणार नाही अशी दर्पोक्ती ते करीत असतात. यात अजून भर म्हणून की काय त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लावणारे कर्मचारीही 'हम किसीसे कम नहीं' म्हणत या महाशयांचाच कित्ता गिरवित असतात. तेव्हा आपले गाऱ्हाणे कोणाकडे मांडावे ? हा प्रश्न सध्या तांदळीकर ग्रामस्थांना पडलेला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या