रवी भोंगाने साकोली
साकोली :-साकोली तालुक्यात चारही बाजूला
मोठमोठ्या रस्त्यांचे जाळे पसरलेले आहेत. या महामार्गावरून वाहतूक करणाऱ्यांसाठी सूचनाफलक, दिशादर्शक आणि गावाचे नाव फलक लावले जातात. परंतु हे फलक कधी कुणाचा आधार कसा ठरतील हे काही सांगता येत नाही. सध्या राष्ट्रीय महामार्गावरील एका गावाचे गाव नाव निर्देश फलक गावातील जनावरांचा आधार ठरलेला आहे. साकोली तालुक्यातील धर्मापुरी ( कुंभली ) हे गाव. या गावावरून साकोली ते वडसा असा राष्ट्रीय महामार्ग जातो. ( आधीचा राज्यमार्ग ) या महामार्गावर सूचना फलक, दिशादर्शक आणि गाव निर्देश फलक लावलेले आहेत. सहाजिकच हे फलक रस्त्याच्या कडेला लावलेले आहेत. मात्र या फलकाचा उपयोग गावकरी आपले पाळीव जनावरांना बांधून ठेवण्यासाठी करीत आहेत. त्यामुळे हे फलक गाव निर्देशित करतात की जनावरांना निर्देशित करतात असा प्रश्न निर्माण झालेला आहे. उद्या एखाद्या अपघातात रस्त्यावरील फलकाला बांधलेल्या जनावरांचे कमी जास्त झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार ? विशेष म्हणजे धर्मापुरी या गावात पाळीव जनावरे मोठ्या प्रमाणात असून रोज रस्त्याच्या कडेला बांधले जातात. यामुळे वाहतुकीलाही अडचण निर्माण होते. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्याला लागून जनावरे बांधण्यास मनाई करावी आणि राष्ट्रीय महामार्ग वाहतूक विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्यांनी केलेली आहे.


0 टिप्पण्या