राकेश आसोले चित्रा न्युज
सांगली :-रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर छोट्या घटक पक्षांना सन्मानजनक वागणूक देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. खोत म्हणाले, "रयत क्रांती संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात चांगले काम केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये आमचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढले, तुरुंगात गेले, अंगावर गुन्हे घेतले."
"आगामी विधानसभेला सामोरे जात असताना, जे छोटे घटक पक्ष आहेत, त्यांना सन्मानजनक वागणूक देणे अत्यंत गरजेचे आहे. आयाराम गयाराम यांचे किती लाड पुरवावे यालाही कुठेतरी थोडेसे निर्बंध असणे गरजेचे आहे," असे खोत यांनी स्पष्ट केले.
"2014 ला भारतीय जनता पक्षाबरोबर रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि रिपब्लिकन हे छोटे पक्ष होते. आम्ही महाराष्ट्रामध्ये सत्ता आणली. 2019 ला ही आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो. कारण आम्ही विस्थापितांची बाजू घेऊन लढाई लढत असतो. प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही लढत असतो," असे खोत यांनी सांगितले.
"गावगाडा आणि विस्थापित सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, बाराबलुतेदार यांचेही नेतृत्व प्रतिबिंब म्हणून आम्ही करत असतो. त्यांचे प्रतिबिंब येणाऱ्या विस्तारामध्ये उमटले पाहिजे आणि निश्चितपणाने तो सन्मान घटक पक्षांना देणे अत्यंत गरजेचे आहे," असे खोत यांनी नमूद केले.
"आमच्याही कार्यकर्त्यांची भावना जाणून घेतली पाहिजे. आमच्याही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण होते ते होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. कारण हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही मोठ्या ताकदींना विजय मिळवून दिला आहे. यावेळीही आम्ही विजय मिळवू," असे खोत यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर छोट्या घटक पक्षांना सन्मानजनक वागणूक देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. महायुतीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आवाहन खोत यांनी केले आहे.


0 टिप्पण्या