Ticker

6/recent/ticker-posts

चिखलावरून दुचाकी स्लिप होवून पोलीस कर्मचारी जागीच ठार


ट्रॅक्टरच्या चिखलाने घेतला रक्षकाचा जीव

 लाखांदूर येथील घटना


कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- रात्र पाळीत कर्तव्य बजावून दुचाकीने घराकडे जात असलेल्या पोलिस अंमलदाराची दुचाकी चिखलावर गेल्याने स्लीप होऊन पोलिस अंमलदार खाली पडल्याने डोक्याला जबर मार लागून जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवार(ता.६जुलै) रोजी रात्री ११:३० वाजता दरम्यान लाखांदूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक ३५३ वरील किशोर कापड दुकानासमोर घडली. मृतक पोलिस अंमलदराचे नाव अनिल नामदेवराव राठोड(३७) रा. कारपा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, हल्ली मुक्काम लाखांदूर असे आहे. 
                       पोलिस अंमलदार अनिल राठोड शनिवारी रात्री पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होते. आपली शासकीय कामे आटोपून रात्री ११:३० वाजता दरम्यान दुचाकीने घरी जाण्याकरिता निघाले. महामार्गावर किशोर कापड दुकानासमोर ट्रॅक्टर च्या पडलेल्या चिखलावरून त्यांची दुचाकी गेल्याने स्लीप होऊन समोरून जाणाऱ्या सायकलस्वारास धडक देऊन ते रस्त्यावर पडल्याने डोक्यास जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले. तर सायकलस्वार दिनेश कोटरंगे किरकोळ जखमी झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. तो एका बियर बार मध्ये कर्मचारी असून बियरबार चे काम आटोपून घरी जात होता. घटनास्थळाचे आजूबाजूला असलेल्या नागरिकांना अपघात झाल्याचे निदर्शनास येताच लाखांदूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पोलिस वाहनाने अनिल राठोड यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे दाखल केले असता कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकाऱ्याने तपासून मृत घोषित केले. मृतक पोलिस अंमलदार अनिल राठोड यांचे मृत्यू पश्चात पत्नी व मुलगा आहे. ते कारपा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम येथील असून मागील ३ वर्षापासून लाखांदूर पोलिस ठाण्यात पोलिस अंमलदार या पदावर कार्यरत होते. या पूर्वी त्यांनी लाखनी पोलिस ठाण्यात आपली सेवा दिली आहे. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच लाखांदूर शिवाय जिल्ह्यातील इतरही पोलिस ठाण्यातील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठीतांशी सलोख्याचे संबंध असल्याने ग्रामीण रुग्णालयात गर्दी झाली होती. त्यांच्या अकाली निधनाने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. 


शोकाकुल वातावरणात निरोप

मृत पोलिस अंमलदार अनिल राठोड यांच्या पार्थिवाचे उत्तरीय परीक्षण झाल्यानंतर शवविच्छेदन गृह ते पवनी टीपॉइंट पर्यंत निरोप यात्रा काढण्यात आली. त्यात लाखांदूर वासियांनी पुष्प उधळून त्यांना अखेरचा निरोप दिला. या प्रसंगी पोलिस अधिकारी व कर्मचारी भावूक होऊन डोळे पाणावले होते. 


चिखलाने केला घात

दरवर्षी खरीप हंगामात लाखांदूर सह जिल्ह्यातही ट्रॅक्टर चालक शेतात चिखलटी करून झाल्यावर चिखलाने माखलेले ट्रॅक्टर मुख्य मार्गावर आणतात. त्यामुळे चिखल रस्त्यावर येऊन रस्ता चिखलाने माखतो. यावरून वाहन गेल्यास घसरून अपघात होण्याची शक्यता असते. असाच प्रकार पोलिस अंमलदाराशी झाल्याने चिखलाने केला घात असे म्हणण्याची पाळी शहरवासियांवर आली आहे. 


ठाणेदाराने दिली होती ताकीद

रोवणीच्या हंगामात चिखलाने माखलेला ट्रॅक्टर रस्त्यावर आणल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी ट्रॅक्टर चालक मालकांना ट्रॅक्टर धुवून रस्त्यावर आणण्याचे आवाहन केले होते. याची अवहेलना केल्यास सक्त कारवाईची ताकीद दिली होती. पण ट्रॅक्टर चालक मालकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अपघात झाला. 


प्रतिक्रिया
रस्त्यावर असलेल्या चिखलावरून दुचाकी गेल्याने स्लीप होऊन पोलिस अंमलदारास जीव गमावावा लागला. अशी घटना कोणासोबत आणि कुठेही घडू शकते. त्यामुळे ट्रॅक्टर चालक मालकांनी ट्रॅक्टर पाण्याने धुवूनच रस्त्यावर आणावे. अन्यथा कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. नागरिकांनीही चिखलाने माखलेले ट्रॅक्टर रस्त्यावर दिसल्यास पोलिसांना कळवून सहकार्य करावे. या बाबद तहसीलदार लाखांदूर यांचेशी चर्चा झाली असून सोमवारी या बाबद नोटीस काढणार आहे. 

सचिन पवार, पोलिस निरीक्षक लाखांदूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या