• भूमाफिया व नगर पंचायत मुख्याधिकारी यांचे संगनमत
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:-लाखनी येथील गट क्रमांक २६३/१, २६३/२, २६४/१, २६४/२ ह्या कृषी झोन मधील शेतजमिनी नियमाप्रमाणे अकृषक करता येत नसतानाही तसेच हे गट क्रमांक ३१ डिसेंबर २०२० नंतर संपादित केले असताना महाराष्ट्र गुंठेवारी कायदा लागू होत नसतांनाही लेआऊट चे तत्कालीन मुख्याधिकारी व भूमाफिया च्या संगनमताने बेकायदेशीररित्या नियमितीकरण करून शासन व जनतेची फसवणूक केली असल्यामुळे नियमितीकरण रद्द करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. या करिता सामाजिक कार्यकर्ता डॉ. दिपराज इलमकर यांनी जिल्हा सहआयुक्त नगर पालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांचेकडे तक्रार दाखल केली आहे. जिल्हा सहआयुक्ताकडून संबंधितांवर काय कारवाई केली जाते. याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
मौजा लाखनी येथील कृषी झोन मध्ये येत असलेली शेतजमीन गट क्रमांक २६३/१, २६३/२, २६४/१, २६४/२ एकूण क्षेत्र १.६४ हेक्टर आर ही सर्व जागा एका भूमाफियाने विकत घेऊन सर्व गटांवर एकूण ७३ प्लॉट चे लेआऊट तयार करून तत्कालीन मुख्याधिकारी व इतर संबंधितांशी संगनमत करून सर्वच प्लॉट स्वतःचे नावाने नियमितिकरण करून घेऊन शासनाची फसवणूक केली. नियमानुसार गुंठेवारी प्लॉट धारकांनी स्वतः च्या प्लॉट/भूखंडाचे नियमितिकरण करण्यासाठी अर्ज करणे अनिवार्य होते. पण जमीन मालक भूमाफियाने सर्वच ७३ प्लॉट चे स्वतःचे नावाने अर्ज करून बेकायदेशीरपणे ७३ प्लॉट चे नियमितिकरण करून घेतले व त्या करिता लागणारे शुल्क एक मुस्त रक्कम रुपये २ लाख ७३ हजार ७४६ दिनांक २० ऑक्टोबर २०२२ ला नगर पंचायतीकडे भरणा केलेला आहे. ३१ डिसेंबर २०२० पूर्वी खरेदी केलेल्या मोकळ्या प्लॉट/भूखंडाचे नियमितिकरण करण्यासाठी गुंठेवारी कायदा अस्तित्वात आला असून भूमाफियाने गट क्रमांक २६४/२ ही जागा जुलै २०२१ ला विकत घेतली. तरीही सदर गटाचे नियमितिकरण करून घेऊन शासनाची फसवणूक केली आहे.
भूमाफियाने भूमी अभिलेख कार्यालयाकडून गट क्रमांक २६३/१, २६३/२, २६४/१, २६४/२ एकूण क्षेत्र १.६४ हेक्टर आर जागेची हद्द कायम मोजणी न करता स्केल मध्ये प्रमाणित नसलेला बेकायदेशीर लेआऊट नकाशा अभियंत्याकडून तयार करून घेऊन शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केली आहे. तसेच भूमाफियाने या सर्व गटांच्या जागेची हद्द कायम मोजणी न करता स्केल मध्ये प्रमाणित नसलेला बेकायदेशीर लेआऊट नकाशा तयार केला. गुंठेवारी कायद्यानुसार अर्ज करण्यात आलेल्या प्रत्येक प्लॉट चे भूमी अभिलेख कार्यालयाकडून गुंठेवारी मोजणी करून न घेता नियमित करून घेतल्याने शासनाचा राजस्व बुडवून फसवणूक केली आहे. भूमाफिया चे आधीचे जमीन मालकाने गट क्रमांक २६४ ची मे २०१५ ला पोटहिस्सा मोजणी केली असता "क" प्रत मध्ये पोटहिस्सा कार्यवाही करण्यात आल्याचे नमूद आहे. पण भूमाफियाने सदर गट क्रमांकाची मार्च २०२३ ला अतीतातडीची पोटहिस्सा मोजणी केली. त्याप्रमाणे ७/१२ चे क्षेत्र, नकाशाचे क्षेत्र व वहीवाटीचे क्षेत्र मेळात बसत नसल्याने दोन्ही मोजण्यात विरोधाभास असल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाचे कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोटहिस्सा कार्यवाही नुसार गटक्रमांक २६३/१, २६३/२, २६४/१, २६४/२ चे वहीवाटीचे क्षेत्र नकाशाबाहेर दाखवून त्याचे एकूण क्षेत्र १६ हजार २०० चौरस मीटर आहे. तर लेआऊट नकाशा मधील क्षेत्र १६ हजार ४०० चौरस मीटर असल्याने तफावत आहे. असे तक्रारीत नमूद आहे.
सहाय्यक संचालक नगररचना कार्यालय भंडारा यांनी वरील चारही गट क्षेत्र १.६४ हेक्टर आर कृषी झोन मध्ये समाविष्ट असून नवनिर्मित नगरपंचायत मध्ये आहे. सदर जागा मंजूर विकास योजना लाखनी नुसार कृषी विभागात अंतर्भूत असल्याने उक्त जागेचा रहिवासी प्रयोजनार्थ वापर करता येत नसल्याचे २२ सप्टेंबर २०२१ ला मुख्याधिकारी नगर पंचायत लाखनी यांना पत्र दिले होते. पण भूमाफियाने या पत्राला केराची टोपली दाखवून कृषी झोन मधील जागा गुंठेवारी कायद्याअंतर्गत नियमित करता येत नसतांनाही मुख्याधिकारी व संबंधीतांशी संगनमत व अर्थकारण करून गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली असल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल कडून त्यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता डॉ. दिपराज इलमकर यांनी केली असून जिल्हा सहआयुक्त नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांचेकडे तक्रार केली आहे. यावर काय कारवाई केली जाते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या