Ticker

6/recent/ticker-posts

माहिती अधिकाराचा अर्ज येण्याआधीच अर्जदाराला माहिती केली उपलब्ध

• सावरी ग्रामपंचायत सचिवाचा अफलातून कारभार


कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा:- माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये एखाद्या शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयास अर्ज प्राप्त झाल्यास जन माहिती अधिकाऱ्याने ३० दिवसांत अर्जदाराला माहिती पुरविणे बंधनकारक आहे. पण काही जनमाहिती अधिकाऱ्याच्या चुकीमुळे होत्याचे नव्हते झाल्याचा प्रकार सावरी/मुरमाडी ग्रामपंचायतीत उघडकीस आला. जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीला माहिती अधिकारान्वये अर्ज उपलब्ध होण्याआधीच अर्जदाराला माहिती उपलब्ध करण्यात आल्याचे वास्तव समोर आल्याने जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवकाचा अफलातून कारभार उघडकीस आला आहे.   
                        शासकीय कार्यालयातील कामकाजात पारदर्शता यावी. तथा कार्यालयीन कामकाजाची माहिती जनतेला व्हावी. या करिता केंद्र शासनाने २००५ मध्ये माहिती अधिकार अधिनियम संमत करून अंमलात आणला आहे. त्यामुळे सज्ञान भारतीय नागरिकास कोणत्याही शासकीय व निमशासकीय कार्यालयातून माहिती घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या करिता शासनाचे वतीने जनमाहिती अधिकारी व मदतीकरिता सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांची नेमणूक करून ३० दिवसांत माहिती उपलब्ध करावी. अशी या कायद्यात तरतूद असून मुदतीत माहिती उपलब्ध न केल्यास प्रथम अपील व त्यानंतर दुसऱ्या अपिलाचे प्रावधान आहे. जनमाहिती अधिकारी हेतू पुरस्पर माहिती देण्यास टाळाटाळ करीत असेल दुसऱ्या अपिलात सिद्ध झाल्यास प्रति दिवस २५० किंवा २५ हजार रुपये या पेक्षा कमी असेल ती रक्कम जनमाहिती अधिकाऱ्यास दंड स्वरूपात भरण्याची कायद्यात तरतूद आहे. 
                           प्रमिला प्रकाश नान्हे प्रभाग क्रमांक २ जुन्या हनुमान मंदिराजवळ सावरी/मुरमाडी यांनी जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक ग्रामपंचायत सावरी यांना माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये विहित नमुन्यात अर्ज करून आबादी जागेत बांधकाम करण्यात आलेल्या नालीच्या ठरावाची सत्यप्रत देण्यात यावी. जे नालीचे बांधकाम करण्यात आलेले आहेत. ते सार्वजनिक रोडवर केले असल्याबाबद रोड च्या नकाशाची दुय्यम प्रत देण्यात यावी. ज्या नाल्याचे बांधकाम करण्यात आलेल्या आहेत ती रोड ची जागा ग्रामपंचायतीला हस्तगत झाली असल्याची सत्यप्रत देण्यात यावी, नालीचे काम करण्यात आलेल्या योजनेचे नाव, कोणत्या फंडातून करण्यात आले, बांधकामाचे इस्टीमेट, बांधकामाचा नकाशा व त्याला मिळालेली प्रशासकीय मंजुरी, फॉर्म ६५-५५ चेक मेमोरंडम सिमेंट कंजमशन स्टेटमेंट, डिटेल कम्लेशन सर्टिफिकेट, काम करणाऱ्या यंत्रणेची माहिती, कामावरील, मजूर त्यांच्या हजेरीपटाची प्रत, केलेल्या कामाची एम.बी. ची सत्यप्रत, काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, बांधकाम व साहित्य पुरवठ्याची कामे करण्याकरिता ई-टेंडरींग केले असल्याबाबदची माहिती व त्याद्वारे आपणास प्राप्त झालेले बांधकाम व साहित्य पुरवठ्याचे संपूर्ण निविदा/कोटेशन च्या दुय्यम छायांकित प्रत देण्यात यावी. तसेच साहित्य पुरविण्यात आलेल्या लोकांना देण्यात आलेल्या पेमेंट च्या पावत्यांची प्रत देण्यात यावी. वरील मागितलेली संपूर्ण माहितीची सत्यप्रत देण्यात यावी. असा अर्ज केला होता. 
                        आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सावरी येथील आबादी जागेत केवजी गभने च्या घरापासून केशवराव कावळे यांचे घरापर्यंत आणि केशवराव कावळे ते सदाशिव नान्हे यांच्या घरापर्यंत बांधण्यात आलेल्या नालीच्या बांधकामाबाबद माहितीचे स्वरूप होते. अर्जदार प्रमिला नान्हे यांना ग्रामसेवक ग्रामपंचायत सावरी यांचे जावक क्रमांक ८१२ दिनांक १३/०७/२०२४ रोजी पाठविलेल्या पत्रानुसार आपले अर्ज दिनांक १४/०७/२०२४ रोजी पत्रानुसार विचारलेल्या अधिकार अधिनियम २००५ अन्वये पत्रात नमूद असलेली माहिती ही कार्यालयास उपलब्ध असून कार्यालय दस्ताऐवजी उपलब्ध आहेत. त्यानुसार आपणास माहिती पुरविण्यात आहे सदर माहितीचे झेरॉक्स एकूण प्रति एवढे आपणास देण्यात येत आहे. असे पत्र निर्गमित करण्यात आले. या पत्रानुसार १४/०७/२०२४ रोजी माहिती अधिकारान्वये अर्ज करण्यात आल्याचे दिसून येते. तर १३/०७/२०२४ रोजी माहिती देण्यात येत आहे. असे नमूद आहे. म्हणजेच ग्रामपंचायतीला माहिती अधिकारान्वये अर्ज येण्याआधीच जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक माहिती उपलब्ध करीत असल्याचे दिसून येत असल्याने सावरी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या