Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी पोलिस ठाण्यात ९ महिन्यात ५ ठाणेदार..!

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
 भंडारा  :- महामार्गावर असलेल्या तथा संवेदनशील पोलिस ठाणे म्हणून ख्याती प्राप्त लाखनी पोलिस ठाण्यात ऑक्टोबर २०२३ चे शेवटी पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे तडकाफडकी पोलिस मुख्यालयात स्थानांतरण करण्यात आले. त्यांचे जागी १ नोव्हेंबर २०२३ पासून पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांची पदस्थापना करण्यात आली. पण त्यांचेही ७ मार्च २०२४ रोजी नक्षल सेल भंडारा येथे स्थानांतरण करण्यात आले असून त्यांचे जागी पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी कार्यभार न स्वीकारताही त्यांचे आठवडाभरात इतरत्र स्थानांतरण करून त्यांचे जागेवर पवनी येथून बदलून आलेले पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचेही १० ऑगस्ट रोजी वर्धा येथे स्थानांतरण करण्यात आले. पण त्यांचे जागेवर कोणाचीही नियुक्ती केली गेली नाही याबाबद माहिती होताच लाखनी पोलीस ठाण्यात ९ महिन्यात ५ ठाणेदारांची नियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.   
         पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी एप्रिल २०२२ मध्ये लाखनी पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे करून अवैध व्यवसायावर वचक निर्माण करून अल्पावधीतच लोकप्रियता मिळविल्याने शहरासह ग्रामीण परिसरातील अनेक सामाजिक व सांस्कृतिक संघटनांशी त्यांचे जवळचे संबंध प्रस्थापित झाले होते. त्यांचे कार्यप्रणालीमुळे पोलिस ठाण्यातील कर्मचारी वर्गही खुश असताना अचानक कुठे मशी शिंकली कोण जाणे. त्यांचे जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलिस नियंत्रण कक्षात तडकाफडकी स्थानांतरण करण्यात आले. त्यांचे जागी पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांची पदस्थापना करण्यात आली. त्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी पदी बढती होणार असल्याने त्यांनी अनिच्छेने काय होईना पण पदभार स्वीकारला. अल्पावधीतच योग्य रीतीने कार्यभार केला. तसेच जनतेच्या हिताचे अनेक प्रश्न स्थानिक पत्रकारांच्या मदतीने सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही आले. कर्तव्यदक्ष ठाणेदार म्हणून ओळख निर्माण होत असताना त्यांचे अचानक पोलिस मुख्यालयातील नक्षल सेल विभागात  स्थानांतरण करण्यात आले. त्यांचे जागेवर ७ मार्च २०२४ चे आदेशान्वये पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांची नियुक्ती करण्यात आली. पण आठवडाभराचा कालावधी होऊनही त्यांनी कार्यभार स्वीकारला नव्हता. अशातच पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. त्यात त्यांची तुमसर येथे बदली करण्यात आली. पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांचे जागेवर पवनी येथून बदलून आलेले पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांनी लाखनी पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला त्यांचीही ५ महिन्यातच १० ऑगस्ट २०२४ रोजी वर्धा येथे स्थानांतरण करण्यात आले आहे. त्यांचे जागेवर कोणत्याही पोलीस निरीक्षकाची पदस्थापना करण्यात आली नाही . याबाबद शहरात माहिती होताच लाखनी पोलिस ठाण्यात  ९ महिन्यात ५ ठाणेदार अशा खमंग चर्चांना पेव फुटले असले तरी नवनियुक्त ठाणेदाराने सामाजिक बांधिलकी जोपासून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. अशी जनतेकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या