Ticker

6/recent/ticker-posts

देवकार्याच्या नाचामध्ये वाद विकोपाला : चाकू हल्ल्यात तरुणाचा अंत

संजय देशमुख चित्रा न्युज
सोलापूर: नागोबाचीवाडी येथील पारधी समाजाच्या लक्ष्मीआईच्या देवकार्याच्या दिवशी झालेल्या वादातून एका 30 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृतकाची पत्नी संगिता धनराज काळे हिने बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

संगिता काळे (वय 27) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या व त्यांचा पती धनराज हिरा काळे (वय 30) हे मुंबईत गजरे विकून आपली उपजिवीका भागवतात. त्यांना एक मुलगा महादेव आणि एक मुलगी गौरी असून, दोघेही मोहोळ येथे शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये राहतात. संगिता व धनराज यांनी आपला मोठा दीर ऐजिनाथ यांच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी आशा आणि मुलगा विष्णू यांची देखील काळजी घेतली आहे. आशा मुंबईत मांदूंगा येथे जाऊन पेपरचे चक्री विकण्याचे काम करते.

दिनांक 4 ऑगस्ट रोजी पारधी समाजाच्या लक्ष्मीआईच्या देवकार्याच्या कार्यक्रमादरम्यान, धनराज यांनी पत्नी संगिताला उचलून नाचल्याने त्यांची जाऊ आशा (वय 35) रागाने संध्याकाळी 7 वाजता मुलगा विष्णू याला घेवून घरी निघून गेली. त्यानंतर धनराज देखील तिच्या पाठीमागे घरी गेले. काही वेळानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी कुणीतरी संगिताला सांगितले की, घरी धनराज व आशा यांच्यात भांडण सुरू आहे.

संगिता घरी पोहोचल्यावर तिने पाहिले की, धनराज पोटाला हात धरून बाहेर आले व त्यांनी सांगितले की, आशाने त्यांना चाकू मारला आहे. त्यावेळी घरातून आशा हिचा मुलगा विष्णू देखील बाहेर आला आणि त्याने सांगितले की, आईने काकाच्या पोटात चाकू मारल्यामुळे त्याच्या हाताला देखील जखम झाली आहे. संगिताने तत्काळ शेजारी व नातेवाईकांना बोलावून घेतले आणि त्यांनी धनराज यांना बार्शीच्या सरकारी दवाखान्यात नेले. तेथून त्यांना जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी येथे रेफर करण्यात आले.

उपचार सुरू असताना धनराज यांनी सांगितले की, आशाने देवकार्याच्या नाचावरून वाद करत त्यांना चाकू मारला. उपचार सुरू असताना धनराज यांचा 5 ऑगस्ट रोजी रात्री 12:30 वाजता मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टर्सनी दिली. 

संगिता काळे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये आशा ऐजिनाथ काळे हिच्यावर भांडण करून पोटात चाकूने मारून जिवे ठार मारल्याचा आरोप केला आहे. पोलीसांनी आरोपी आशा ऐजिनाथ काळे हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नागोबाचीवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या