संजय देशमुख चित्रा न्युज
सोलापूर : बार्शी तालुक्यातील शेतकरी हणमंत गणपत भोसले यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे त्यांच्या मुलाच्या शेती कर्जासाठी केलेल्या अर्जाच्या नकाराविरोधात तक्रार दाखल केली आहे.
भोसले यांच्या मुलाने, दयानंद हणमंत भोसले यांनी, बार्शी तालुक्यातील मौजे भोईजे येथे गट नंबर ४२४/२ याचे क्षेत्र ०.८० हेक्टर खरेदी केले आहे. खरेदीखतानंतर, IDBI बँक शाखा भोईजे येथे शेती मशागतीसाठी कर्ज मागणी केली होती. परंतु, बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्ज देण्यास नकार दिला. भोसले यांनी या नकाराविरुद्ध सोलापूर येथील वरिष्ठ क्षेत्रीय प्रमुखांना भेट दिली असता, त्यांनी मुल्यांकन दाखला घेऊन कर्ज मागणी करावी असे सुचवले. त्यानुसार, भोसले यांनी मुल्यांकन दाखला घेतला पण बँक अधिकाऱ्यांनी फेरफार दाखला आणण्याची मागणी केली. आवश्यक कागदपत्रे सादर करूनही कर्ज नाकारण्यात आले.
भोसले यांनी या परिस्थितीला शेतकऱ्यांसाठी आणि शेती विकासासाठी घातक असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी या बाबतीत सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांच्या कर्ज मागणीची पुर्तता तात्काळ करावी अशी विनंती केली आहे. त्यांनी चेतावणी दिली आहे की, त्यांच्या विनंतीची दखल घेतली गेली नाही तर दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी बार्शी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.
तक्रारीची प्रत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, रिर्झव्ह बँक, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.


0 टिप्पण्या