Ticker

6/recent/ticker-posts

मजूर हजेरी पत्रकावीणा सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू...!

• निलागोंदी येथील प्रकार

• व्यथा- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची 


कालिदास खोब्रागडे,चित्रा न्युज
भंडारा :- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत आधी मजूर मागणी नंतर कुशल किंवा अकुशल कामास सुरुवात करावी. अशी कायद्यात तरतूद असली तरी यास बगल देऊन निलागोंदी येथे मजूर हजेरी पत्रकावीणाच सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आल्याचा अफलातून प्रकार उघडकीस आला. सरपंच संघटनेचे ग्रामपंचायतीला टाला ठोको आंदोलन सुरू असताना कंत्राटदाराने बांधकाम सुरू केले कसे? हा चिंतनाचा विषय झाल्याने कंत्राटदारावर कारवाई होणे गरजेचे झाले आहे. 
                          निलागोंदी वस्तीतून जांभळी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पुरुषोत्तम सेलोकर ते सुभाष हटवार यांचे घरापर्यंत रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असे. यात काही दुचाकीचे किरकोळ अपघातही झाले. ग्रामस्थांचे मागणी वरून काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे प्रयत्नाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना(राज्य) अंतर्गत १० लक्ष रुपये अंदाजपत्रकिय रकमेच्या सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामास मंजुरी प्रदान करण्यात आली. ई-निविदा पद्धतीने ह्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम साकोली येथील एका कंत्राटदारास देण्यात आले आहे. यावर तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाचे काम उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग साकोली यांचे मार्गदर्शनात कनिष्ठ अभियंता झाडे यांचेकडे सोपविण्यात आले आहे. 
                          एमआरईजीएस अंतर्गत कुशल काम करावयाचे झाल्यास आधी ग्रामपंचायतीकडून मजुरांची मागणी करून मजूर हजेरी पत्रक तहसील कार्यालयाच्या मग्रारोहयो विभागाकडून एमआयएस झाल्याशिवाय काम सुरू करता येत नाही असा नियम आहे. त्यानंतर कामावर कार्यरत मजुरांची ऑनलाईन हजेरी घेणे बंधनकारक असले तरी निलागोंदी येथे मागील २ ते ३ दिवसापासून सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम मजुर हजेरी पत्रकावीणाच सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे. सिमेंट रस्ता बांधकाम सुरू करतांना कनिष्ठ अभियंत्याचे तांत्रिक मार्गदर्शनात बांधकाम सुरू करणे आवश्यक असताना बांधकाम सुरू करतांना कनिष्ठ अभियंता कामावर उपस्थित नव्हते. असे गावकऱ्यांचे म्हणने आहे. या प्रकाराने कंत्राटदाराची मुजोरी चव्हाट्यावर आली आहे. उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग साकोली यांनी या सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामाची चौकशी करून मजूर हजेरी पत्रकावीणा नियमबाह्य बांधकाम करणार कंत्राटदारावर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. 
*माहिती व सूचना फलक नाही(चौकट)*
कोणत्याही शासकीय योजनेतून विकास कामे करावयाची झाल्यास काम सुरू करण्यापूर्वी दर्शनी भागात माहिती व सूचना फलक लावून त्यावर कामाचे नाव, अंदाजपत्रकिय रक्कम, एजेन्सी, आर्थिक वर्ष, कंत्राटदाराचे नाव, काम सुरू झाल्याचा दिनांक इत्यादी मजकूर नमूद करणे आवश्यक आहे. पण निलागोंदी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामावर माहिती व सूचना फलक लावले गेले नाही. 
*प्रतिक्रिया/स्टेटमेंट(चौकट)*
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत निलागोंदी येथे कंत्राटदाराकडून सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम सुरू असले तरी कंत्राटदाराने ग्रामपंचायतीकडे मजुरांची मागणी केली नसल्यामुळे मजूर पुरवठा केला गेला नाही. 
*खुशाल भुरे, रोजगार सेवक, निलागोंदी*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या