Ticker

6/recent/ticker-posts

मरणाने केली सुटका व्यवस्थेने छळले होते...


रवी भोंगाने साकोली
साकोली:-आपल्या विदर्भात एक सुप्रसिद्ध कवी होऊन गेलेत. मूळ नागपूरचे असलेले हे कवी केवळ कवीच नव्हे तर सुप्रसिद्ध गझलकार म्हणून प्रसिद्ध पावलेत. विशेष म्हणजे त्यांचे पाऊल साकोली नगरीला देखील कधीकाळी लागले होते आणि त्यांची भेट जेष्ठ पत्रकार अशोक गुप्ता यांच्याशी झाली हे  विशेष. त्यांचे अनेक कविता संग्रह गाजलेच नव्हे तर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश झालेला आहे. याही पलीकडे त्यांच्या कवितांना गान कोकिळा स्व. लता मंगेशकर यांनी  स्वर देऊन त्यांच्या कवितांना अजरामर केले. ते नाव आहे सुरेश भट. सुरेश भट यांच्या अनेक कवितांपैकी एक कविता होती " इतकेच मला जातांना कळले होते सरणावर ". या कवितेचे प्रत्यंतर साकोली मधिल एका प्रकरणावर दिसून येत आहे. त्यांच्या कवितेची पहिली ओळ होती, " इतकेच मला जातांना सरणावर कळले होते , मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ". यात फक्त थोडासा बदल करून म्हणावेसे लागेल,"  मरणाने केली सुटका व्यवस्थेने छळले होते. साकोली शहराच्या बाहेर चुलबंद नदीच्या पात्रावर मोक्षधाम आहे. साकोली, कुंभली आणि धर्मापुरी येथील नागरिक या मोक्षधामावर अंत्यसंस्कार करीत असतात. प्रदीर्घ जीवनाचा शेवट जिथे होतो ते मोक्षधाम विकासापासून अनेक वर्षांपासून कोसो दूर आहे. या मोक्षधामाकडे बघितले तर साकोली शहर म्हणून मिरवितांना या ठिकाणी सर्व राजकीय प्रतिनिधींची  बोलती बंद होते.  वादळ, वारा, ऊन्ह, पाऊस, पिण्याचे पाणी, बसण्याची अव्यवस्था, विजेचा अभाव, रस्ते यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण बाबींकडे अनेक वर्षापासून दुर्लक्षित करण्यात आले. ज्या ठिकाणी शेवटी चिरशांती घेऊन नश्वर देहाला त्यागावे लागते. अशा ठिकाणच्या स्थळाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत. नगरपरिषदेने नगर विकास निधीत या मोक्षधामाचा समावेश करावा. जेणेकरून या विकास निधीतून या स्थळाचा विकास आराखडा तयार करता येईल. जीवन जगत असतांना तसेही अनेक व्यवस्थेकडून विविध प्रकारे छळ होतच असतो. सध्यातरी या मोक्षधामाकडे बघून म्हणावे लागेल, " मरणाने केली सुटका, व्यवस्थेने छळले होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या