Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणार ?

रुग्णालयाप्रती लोकप्रतिनिधींसह शासन उदासीन  

रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज

 भंडारा -   आरोग्य सेवा हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे प्रत्येकाला आरोग्यसेवा मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून शासनाने आरोग्य विषयक धोरण आखले आहे मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे तसेच शासनाच्या दुजाभावाने अजूनही शेवटचा घटक आरोग्य सेवा मिळण्यापासून वंचित आहे. असाच प्रकार लाखनी ग्रामीण रुग्णालयात अनुभवास मिळत आहे. लाखनी हे राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्याचे शहर असून तालुक्यातील नागरिक उपचारासाठी  येथे येत असतात. गरीब व गरजू नागरिक प्राधान्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येतात. तर राष्ट्रीय महामार्ग लाखनी शहराला दोन भागात विभागून गेल्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठे आहे नेहमीच किरकोळ व मोठे अपघात होत असतात याशिवाय शाळेत    आयोजित रोगनिदान व इतर शिबिर आदी कामे येथील कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत मात्र त्यामानाने सुविधा देण्यास अपुऱ्या मनुष्यबळामुळे येथील ग्रामीण रुग्णालय सक्षम नसल्याचे दिसून येत आहे तर रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. 
           लाखनी शहराला   तालुक्याचा दर्जा मिळाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतरण करण्यात आले तर हे प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा ( वाघ) येथे स्थलांतरित करण्यात आले. येथे ३० खाटांची मंजुरी आहे मात्र प्रत्यक्षात २० च खाटा उपचारासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही. अधीपरीचारिका केवळ ७ च आहेत. येथील कामकाजाच्या मानाने ही पदे अपुरी आहेत. शहरात अपघात आणि इतर घटना नित्यनेमाने होत असतात. त्यामुळे त्यांनाही उपचाराची गरज असते. स्तनदा माता, गरोदर स्त्रिया यांच्यावरही उपचार येथे केले जाते सर्व बाबी करत असताना वैद्यकीय अधिकारी व अधीपरीचारिका यांच्यावर कामाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरण करणे गरजेचे झाले आहे. 
शासनाने ८ ऑगस्ट ला जिल्ह्यातील ३ रुग्णालयाचे श्रेणीवर्धन केले असून तुमसर उपजिल्हा रुग्णालयाला सामान्य रुग्णालयात, मोहाडी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात तर वरठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन केले. मात्र लाखनी ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज लक्षात घेता या रुग्णालयाचे  श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालय करणे गरजेचे आहे. मात्र लोकप्रतिनिधींची उदासीनता व शासनाचे दुर्लक्षित धोरण यामुळे या रुग्णालयाकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही. रुग्णालयात दररोज ३५० ते ४०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात तपासनी साठी येत असतात तर आंतररुग्ण विभागात दररोज १५-१६ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. रुग्णालयात ७ अधिपरिचारिका असून २ वार्ड आहेत.  रुग्णांच्या मांनाने येथे अपुऱ्या सोयी असल्यामुळे मूलभूत सुविधांचा अभाव दिसतो. त्यामुळे या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन  होणे आवश्यक आहे . 
*ग्रामीण रुग्णालयाचा जन्मदर घटला(चौकट)* 
येथील रुग्णालयात अनेक वर्षापासून स्त्री रोग तज्ञ पद रिक्त होते. गेल्या काही दिवसापासून येथे नियमित स्त्री रोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी रुजू झाल्या असून त्यांना प्रतिनियुक्ती वर साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. तर एक वैद्यकीय अधिकारी अड्याळ ग्रामीण रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीचे   प्रमाण कमी झाले असून येथील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. 
 *पीएचसी च्या श्रेणीवर्धनाची गरज  (चौकट)* 
चुलबंद नदी खोऱ्यात वसलेला 
मुरमाडी /तुप परिसर दुर्गम भाग म्हणून परिचित असून इथून पालांदुर १५ किमी तर लाखनी २० किमी आहे. जाण्या येण्याची सुविधा नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना वेळेवर आरोग्यसेवा मिळत नाहीत त्यामुळे मुरमाडी /तूप येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करणे आवश्यक झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या