Ticker

6/recent/ticker-posts

चल गं सखे वारुळाला... नागोबाला पुजायाला... नागपंचमी विशेष --

रवि भोंगाने साकोली
साकोली:-वर्षाच्या ३६५ दिवसांमध्ये ज्या दिवशी जमीन खोदणे, भाज्या चिरणे किंवा कोणतेही शस्त्र न वापरणे निषिद्ध मानले जाते असा दिवस म्हणजे नागपंचमी. हे निशिद्ध का ? याचे कुतूहल नव्या पिढीला असते. बऱ्याचदा त्याचे समाधानकारक उत्तरही मिळत नाही. मात्र ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. त्यातही विदर्भ किंवा कृषीप्रधान व्यवस्था जेथे टिकून आहे तेथे अजूनही ही परंपरा पाळली जाते. म्हणूनच नागपंचमीचा सण सर्व दूर साजरा केला जातो. आज नागपंचमी. भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपूजा प्रचलित झाली. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात कोणतेही कामे करीत नाहीत. उलट शेतात जाऊन नागोबाची पूजा केली जाते. साप हा शेतकऱ्यांचा प्राचीन काळापासूनचा मित्र समजला जातो. पिकांची नासाडी करणारे उंदीर आणि तत्सम जीव यांचा बंदोबस्त साप करीत असतो. शेतातील बिळांमध्ये सापांचे वास्तव्य असते. जमीन नांगरतानाही या मित्रांचा जीव जाऊ शकतो. पण शेतात उत्पादन काढायचे तर नांगरणी आवश्यक असते. त्यामुळे किमान एक दिवस नांगरणीला सुट्टी देण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागात काही नागांची देऊळे आहेत. तिथे जाऊन पूजा करण्याची प्रथा आहे. काही भागात तर या दिवशी भाजी चिरणे, चुलीवर, गॅसवर भांडे ठेवणे, कोणत्याही शस्त्राचा किंवा यंत्राचा उपयोग करणे निशिद्ध मानले जाते. वास्तविक या प्रकाराचा आणि सापाचा कुठलाही संबंध नसतो. परंतु परंपरेची व्याप्ती वाढून गेली. कृषी प्रधान संस्कृतीचा प्रभाव कमी झाला तरी परंपरा आजही सुरूच आहे. तसे नाग किंवा सापाविषयी कुतुहल आणि दहशत असते. त्यामुळेच कुठे साप दिसला की त्याची चर्चा होते. तो बघायला लोकांची गर्दी होते. सापाच्या तोंडातील विष ग्रंथीमुळे त्याला मारण्याची माणसाच्या मनात प्रवृत्ती निर्माण होते. अर्थात सारे साप विषारी नसतात. साप म्हणजे माणसाचा शत्रू या गैर समजुतीतून साप मारले जातात. गेल्या काही वर्षात शासन सामाजिक संघटना जनजागृती करीत आहे. पूर्वी अशी जनजागृती नव्हती. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शेतातील कामे बंद ठेवले जात होते. नागपंचमीच्या सणा बाबतीत एक कथा सांगण्यात येते. पुरणातील कथेनुसार तक्षक नागाने केलेला अपराधाबद्दल शिक्षा म्हणून राजा जन्मजायाने सर्प यज्ञ सुरू करून त्यात सर्पाची आहूती देणे सुरू केले. तक्षक नाग स्वतःच्या जीव वाचविण्यासाठी देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला. राजा जन्मजयाने मग इंद्राय स्वाहा: तक्षकाय स्वाहा: असे म्हणून इंद्राचीही आहूती तक्षक नागासमोर देऊन टाकली. त्यावेळी आस्थिक ऋषींनी जन्मजयाला सर्प यज्ञ थांबविण्याची विनंती केली. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. म्हणून या दिवशी नागपंचमी हा सण येतो. पूर्वी या दिवशी गारुडी साप घेऊन घरोघरी फिरायचे. पण आता शासनाने सापांना पकडणे, त्यांना घेऊन फिरणे यावर बंदी घातली आहे. त्यामुळे लोक सापांच्या प्रतिमेची किंवा कुठे वारूळ, नागठाणा ,नाग मंदिर तेथे जाऊन पूजा करतात. तसेच दूध,लाह्या, नैवेद्य दाखवून नागपंचमी साजरी केली जाते. पर्यावरणात भव्य योगदान देणाऱ्या सापांना मारू नये असे पर्यावरण  तज्ञातर्फे सांगण्यात येते. त्यामुळे कुठेही साप दिसल्यास सर्पमित्रांना बोलवता येऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या