Ticker

6/recent/ticker-posts

उघड्यावरील खाद्य पदार्थांनी नागरिकांच्या आरोग्याचे तीन तेरा

अन्न व औषधी प्रशासन कारवाई करणार काय ? 

रवि भोंगाने साकोली

 साकोली :रस्त्या रस्त्यावर लागलेली फेरीवाल्यांची दुकाने, गरमागरम भजी,पाणीपुरी,भेळ, नूडल्स, मंचुरियन या पदार्थांवर घोंगावत असलेल्या माशा आणि त्यांच्यावर ताव मारणारे खवय्ये हे दृश्य आज घडीला सर्वत्र दिसून येते. पावसाळ्यात उघड्यावरील खाद्य पदार्थांमुळे नानाविध आजारांना आमंत्रण मिळते. परंतु अन्न व औषधी प्रशासन त्यांच्यावर कारवाई का करीत नाही हे एक कोडे ठरू पाहत आहे. वैद्यकीय सूत्रानुसार ७० टक्के पोटांचे आजार हे उघड्यावरील पदार्थ खाल्ल्याने होतात. यावर वेळीच आवर घालणे गरजेचे असते. परंतु दुसरीकडे उघड्यावर खाद्यांना विकणाऱ्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्याने हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्याच्या पद्धती बदलल्यात .आज ठीक ठिकाणी खानावळी, हॉटेल, रेस्टॉरंट थाटण्यात आली आहेत.जीभेची चव बदलण्यासाठी प्रत्येक कुटुंब हॉटेलातील पदार्थाचा आस्वाद घेत असतो. मात्र आपण जे खातो ते कितपत योग्य आहे याची माहिती कोणी करून घेत नाही. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी अन्नसुरक्षा मानक कायद्यातील निकषांचा विचार करायलाच पाहिजे.परंतु जिल्ह्यात या कायद्याचा कुणीही विचार करतांना दिसत नाही. हे सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. गत वर्षी अन्न व औषधी विभागाच्या नागपूर येथील चमुने भंडारा जिल्ह्याचा दौरा करून हॉटेल, खानावळी, रेस्टॉरंटमधील पाणी आणि अन्न याची तपसणी केली असता त्यातील अनेक जणांकडे व्यवसाय करण्याचा परवानाच नव्हता. तेव्हा त्यांच्याकडून परवाना दंड आकारण्यात आला होता. त्यानंतर ही मोहीम राबविण्यात आली नाही. साकोलीच्या मुख्य रस्त्यांवर खाद्यानाची अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत. यात लाखांदूर रोड, उपजिल्हा रुग्णालय, एकोडी रोड, नगर परिषद, एम.बी. पटेल महाविद्यालय रोड ,नागझिरा अभयारण्य रोड,प्रगती कॉलनी, बस स्थानक, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय मार्ग रोड अशा मुख्य ठिकाणी खाद्याने विकणारी दुकाने थाटली आहेत. मात्र या दुकानांना परवाने आहेत किंवा नाही याची तसदी अन्न व औषधी प्रशासनाने घेतली नाही. शिवाय या दुकानांमध्ये वापरण्यात येणारे अन्नपदार्थ, पाणी याची गुणवत्ता काय याचाही विचार करण्यात आलेला नाही. उलट या व्यापाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी नोंदणी व परवाने तयार करण्याबाबत भर दिला जात असल्याची माहिती आहे. नियमाप्रमाणे अन्नपदार्थ व विक्रीचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी वापरात येणारे पिण्याचे पाणी याचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासून घेण्यात यावे. ज्या ठिकाणी खाद्यपदार्थाची विक्री सुरू असते त्या ठिकाणी पिण्याचे पाणी शुद्ध असावे असे निकष आहेत.परंतु यापैकी एकही निकषांची पूर्तता केली जात नाही.परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या