• नुकसानीचे क्षेत्र कमी दाखविले
• सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांचा आरोप
कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- जिल्ह्यात १९ जुलै ते २९ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने नदी, नाले व तलावातील पाण्याचा जलस्तर वाढून शेतात शिरल्याने भात, सोयाबीन, भाजीपाला, तूर व कापूस पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून जिल्ह्यात बाधित गावांची संख्या ५१९ असून नुकसानग्रस्त क्षेत्र २३ हजार २६०.५० हेक्टर आहे. तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ४९ हजार १९७ असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी व महसूल विभागाकडून वर्तविण्यात आला असला तरी साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखनी, साकोली व लाखांदूर तालुक्यावर पूरग्रस्त नुकसानीचे सर्वेक्षण करतांना अन्याय करण्यात आल्याचा सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी आरोप केला असून पुनरसर्वेक्षणाची मागणी केली आहे.
मागील खरीप हंगामात धान पीक परिपक्व होण्याचे मार्गावर असताना अचानक रोग व किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आली होती. खरीप हंगाम २०२४ मध्ये चांगले पीक पाणी येईल. या आशेने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून पेरणीसाठी पावसाची वाट धान उत्पादक पाहत होता. रोहिणी कोरड्या गेल्या, मृगाच्या शेवटी व आद्रा नक्षत्राचे सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. पण पावसाने दडी मारल्याने काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने रोपे करपण्याचे मार्गावर होते. तर सुरुवातीला पेरणी केलेले शेतकरी रोवणीसाठी पावसाची चातकासारखी वाट बघत होते. जुलै चे पहिल्या आठवड्यात पाऊस आल्याने पऱ्ह्यांना(रोपे) संजीवनी मिळाली. तर काहींनी रोवणीही सुरू केली होती. १८ जुलै पर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ६८ टक्के पावसाची जिल्हा प्रशासनाने नोंद घेतली होती. असे सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांचे म्हणने आहे.
१९ जुलै रोजी सायंकाळचे सुमारास अचानक आकाशात मेघ दाटून आले. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला असला तरी हा आनंद फार काळ टिकला नाही. १९ ते २९ जुलै पर्यंत संततधार पावसाने तलाव, नदी व नाल्यांचा जलस्तर वाढून २ वेळा पूर परिस्थिती निर्माण झाल्याने पुराचे पाणी शेतात शिरून पिके आठवडाभर पाण्याखाली राहिल्याने भात, सोयाबीन, भाजीपाला, तूर व कापूस इत्यादी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. लोक प्रतिनिधींनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाला नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिल्याने महसूल व कृषी विभाग नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे कामास लागले. भंडारा बाधित गावे १२२, बाधित क्षेत्र १ हजार ३४३.५० हेक्टर तर नुकसानग्रस्त शेतकरी संख्या २ हजार ६७९, मोहाडी बाधित गावे १०८, बाधित क्षेत्र १ हजार ७६९.६९ हेक्टर तर शेतकऱ्यांची संख्या ४ हजार १८१, तुमसर बाधित गावे ६ नुकसानीचे क्षेत्र १०० हेक्टर, शेतकरी संख्या २७५, पवनी बाधित गावे १२८, नुकसानग्रस्त क्षेत्र १२ हजार ७६९.५० हेक्टर, शेतकरी संख्या २५ हजार ८१७, साकोली बाधित गावे ४६ नुकसानग्रस्त क्षेत्र १५७ हेक्टर, शेतकरी संख्या ५०४, लाखनी बाधित गावे २०, नुकसानीचे क्षेत्र ५२.९० हेक्टर, शेतकरी संख्या १३१, लाखांदूर बाधित गावे ८९, नुकसानग्रस्त क्षेत्र ७ हजार ६८ हेक्टर, नुकसानग्रस्त शेतकरी संख्या १५ हजार ६१० असे एकूण बाधित गावे ५१९, नुकसानग्रस्त क्षेत्र २३ हजार २६०.५० हेक्टर तर नुकसानग्रस्त शेतकरी संख्या ४९ हजार १९७ असल्याचे सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांचे म्हणने आहे.
लाखांदूर तालुक्यातून वैनगंगेसह चुलबंद नदी प्रवाहित असल्यामुळे सर्वाधिक पूराचा फटका लाखांदूर तालुक्याला बसला आहे. तसेच लाखनी व साकोली तालुक्यांनाही बसला असून साकोली विधानसभा क्षेत्रातील या तीनही तालुक्यातील बाधित गावे १६५ असून नुकसानग्रस्त क्षेत्र ७ हजर २७७.९० हेक्टर असल्याचे प्रशासनाने प्राथमिक अंदाज वर्तविला असून नुकसानीचे क्षेत्र फारच कमी दाखविण्यात आल्याने साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखनी, साकोली व लाखांदूर तालुक्यावर पूरग्रस्त नुकसानीचे सर्वेक्षण करतांना अन्याय करण्यात आल्याचा सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी आरोप केला असून पुनरसर्वेक्षणाची मागणी केली आहे.


0 टिप्पण्या