Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी तालुक्याचे उत्तर भागास गोसेखुर्द जलाशयाचे पाणी उपलब्ध करावे


• जि. प. सदस्या सुर्मिला पटले यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी  तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) चे उत्तरेस असलेल्या लाखनी तालुक्यातील लाखोरीसह मुरमाडी/सावरी व केसलवाडा/वाघ जिल्हा परिषद क्षेत्रातील ४० गावातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी. या करिता गोसेखुर्द(इंदिरा सागर) जलाशयाचे पाणी उपलब्ध करावे. या करिता लाखोरी च्या जिल्हा परिषद सदस्या सुर्मिला अशोक पटले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र व्यवहार करून साकडे घातले आहे. महिला जि.प. सदस्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
                     लाखनी तालुक्याचे उत्तरेस असलेल्या लाखोरीसह केसलवाडा/वाघ, मुरमाडी/सावरी जिल्हा परिषद क्षेत्रासह भंडारा व साकोली तालुक्याचे सीमावर्ती भागात ४० गावे अवर्षन क्षेत्रात मोडतात. या ठिकाणी अपुऱ्या सिंचन सोयीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना वारंवार दुष्काळ सदृश्य परिस्थितीस सामोरे जावे लागते. वारंवार होणाऱ्या दुष्काळामुळे या गावातील शेतकरी कर्जाचे ओझ्यासह हलाखीचे जीवन यापान करीत आहेत. अपुऱ्या सिंचन सोयी व दुष्काळी परिस्थितीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास पूर्णतः खुंटण्याचे मार्गावर असल्यामुळे आपले पाल्यांना इच्छा असूनही शिक्षण सोय उपलब्ध करून देण्यास असमर्थ आहेत. असे जिल्हा परिषद सदस्या सुर्मिला पटले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. 
                       गोसेखुर्द जलाशय अतिभव्य असून या पासून भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या ३ जिल्ह्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध केले जाते. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) मुळे दोन भागात विभागला गेलेला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे दक्षिणेला असलेल्या जवळपास सर्वच गावांना गोसेखुर्द च्या कालव्याचे येणाऱ्या पाण्याने शेती करिता सिंचनाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील शेती ही वर्तमान स्थितीत सुजलाम् सुफलाम् आहे. परंतु महामार्गाचे उत्तरेस आलेल्या जवळपास ४० गावांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. तथा येथील धान उत्पादक शेतकऱ्यांना वारंवार दुष्काळाला समोरे जावे लागते. महामार्गाच्या उत्तरेकडील ४० गावातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून गोसेखुर्द जलाशयाचे पाणी कालव्याव्दारे सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यात यावे. जेणे करून या ४० गावातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावता येऊन दुष्काळापासून शेतकऱ्यांना मुक्ती मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गावातील शेतकऱ्यांना सिंचन सोय उपलब्ध करून देण्यात यावी. या करिता लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्राच्या जि.प. सदस्या सुर्मिला अशोक पटले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार केला आहे. मुख्यमंत्री काय कार्यवाही करतात याकडे या ४० गावातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

ह्या गावांना होणार फायदा
लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील मानेगाव/सडक, आलेसुर, बोरगाव, राजेगाव, मोरगाव, लाखोरी, निलागोंदी, सिंदीपार, मुंडीपार, सालेभाटा, केसलवाडा/पवार, परसोडी, खुर्शीपार, गोंडसावरी, मासलमेटा, केसलवाडा/वाघ जि.प. क्षेत्रातील खेडेपार, रेंगेपार/कोठा, सोमलवाडा, मेंढा, दैतमांगली, चिखलाबोडी, सोनेखरी, किन्ही, गडेगाव तर मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मुरमाडी, सावरी, पिंपळगाव/सडक, सामेवाडा, खैरी ह्या २९ गावांसह साकोली व भंडारा तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. 


प्रतिक्रिया
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ च्या उत्तरेस असलेल्या गावात सिंचनाची सोय नाही तरीही प्रस्थापित लोक प्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत असे. सामाजिक बांधिलकी या नात्याने आम्ही शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी. या करिता प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी पत्र व्यवहार केला आहे. 

अशोक पटले, सामाजिक कार्यकर्ता, मासलमेटा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या