कुटुंबीयांना नवजात बाळ जिवंत की मृत असा होता संभ्रम
स्मशानभूमीत तणाव सदृश परिस्थिती
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- अस्मिता महेश सतीमेश्राम(२७) लोहारा ह्या विवांहितेला प्रसूतीसाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे शनिवार(ता.१४ सप्टेंबर ) रोजी दुपारी २:३० वाजता भरती करण्यात आले. प्रसूती होण्याआधीच ती दगावली. तिचे उत्तरीय परिक्षण करून मृत नवजात बाळाला उजव्या कुशीत ठेवल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. अत्यंविधीचे वेळी मृत नवजात बाळ दिसून आले नाही त्यामुळे कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी "आधी नवजात बाळ दाखवा नंतर अंत्यसंस्कार" अशी भूमिका घेतल्याने स्मशानभूमीतच तणाव निर्माण झाला. याबाबद प्रशासनाला माहिती होताच अनुचित घटना टाळण्यासाठी अतिरिक्त पोलिस बल मागवून सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय चमूला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. वैद्यकीय चमूने मृत महिलेचे पोटातच नवजात असल्याचे कुटुंबीय व प्रतिष्ठित नागरिकांना दाखविल्याने त्या मृत महिलेवर लोहारा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.
अस्मिता सतीमेश्राम ही दुसऱ्यांदा गरोदर होती. बाळ वजनाने अधिक असल्याची शक्यता असल्याने स्थानिक आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविका यांनी तिला १० किंवा ११ सप्टेंबर रोजी प्रसुतीकरिता दवाखान्यात भरती होण्याचा सल्ला दिला होता. पण पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ती १४ सप्टेंबर रोजी सामान्य रुग्णालय भंडारा येथे प्रसूतीसाठी भरती झाली. या वेळेस तिचे कुटुंबीय सोबत होते. अचानक तिची प्रकृती बिघडल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारणाचा शोध घेण्यासाठी तिचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामान्य रुग्णालयातील शव विच्छेदन गृहात उत्तरीय परिक्षण करुन मृतदेह कुटुंबीयांचे स्वाधीन करण्यात आले. विवाहितेचा मृतदेह स्वगावी लोहारा, तालुका लाखनी येथे शनिवारी मध्यरात्री नेण्यात आला व सकाळी अंत्यसंस्कार करण्याचे कुटुंबीयांनी ठरविले. रविवारी सकाळी अंत्यसंस्कार व मृत नवजात बाळास जमिनीत पुरण्यात यावे असे कुटुंबीयांनी ठरविल्याने अग्निसंस्कार व दफन विधीची स्मशानभूमीत व्यवस्था करण्यात आली. अंत्यसंस्कारापूर्वी शवपेटीतून बाळ आणि मातेचे शव वेगवेगळे पुरण्यासाठी पाहिले असता नवजात बाळाचा मृतदेह दिसून आला नसल्याची बाब निदर्शनास आली. हाहा म्हणता ही बातमी वाऱ्यासारखी आजूबाजूचे गावात पसरल्याने लोकांचा जमाव स्मशानभूमीत जमा होऊ लागला .
आधी बाळ दाखवा नंतरच अंत्यसंस्कार करू अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतल्यामुळे स्मशानभूमीत तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली याबाबद पोलीस व प्रशासनाला माहिती होताच नायब तहसीलदार बेनिलाल मडावी, पालांदूर चे मंडळ अधिकारी राकेश पंधरे, खराशीच्या तलाठी रीना वालमंडले, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर, सामजिक कार्यकर्त्या विजया ठाकरे नंदुरकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगिराज झलके, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद इटवले, लोहारा चे सरपंच नरेश फुंडे, सामाजिक कार्यकर्ता धनंजय घाटबांधे, उपसरपंच खेतराम उपरिकर, पोलीस पाटील विलास मेंढे जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. तर तालुका प्रशासन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे संपर्कात होते. शेवटी प्रशासनाची मध्यस्थी यशस्वी ठरली. लोकांची भीड सतत वाढत असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम, पालांदुरचे सहायक पोलीस निरीक्षक विवेक सोनवाने यांचे नेतृत्त्वात अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अखेर तालुका प्रशासनाची शिष्टाई सफल होऊन डॉ. करंजेकर यांचे नेतृत्त्वात चार सदस्यीय पथक लोहारा येथील स्मशानभूमीत पोहचले व मृतक महिलेच्या पोटातील उजव्या कुशीत ठेवलेले मृतक नवबाळ कुटुंबीय व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना दाखविण्यात आल्याने कुटुंबीय, नातेवाईक व गावकऱ्यातील संभ्रम दूर होऊन त्या मृत महिलेवर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.


0 टिप्पण्या