Ticker

6/recent/ticker-posts

एकीकरणास बसपा सुप्रीमो तयार असतील तर चर्चा

वंचित सुप्रीमो ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची माहिती 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- निवडणुकीचे तोंडावर रिपब्लिकन चळवळीशी तिळमात्र संबंध नसलेल्या मनुवादी पक्षाच्या हस्तकांकडून रिपब्लिकन ऐक्याबाबद प्रयत्न होत असतो. पण राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी व्यतिरिक्त कोणत्याही रिपब्लिकन गटाचा जनाधार नाही. तसेच वंचित आणि बसपा हे आंबेडकरी विचारधारेचे पक्ष असून स्वतःला रिपब्लिकन नेते समजणारे पदाचे लालसेपोटी मनुवादी पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत. आंबेडकरी विचारधारेच्या मतांचे ध्रुवीकरण थांबविणे आवश्यक असून एकीकरणास बसपा सुप्रीमो तयार असतील तर चर्चेची तयारी असल्याचे वंचित बहुजन आघाडी सुप्रीमो ॲड. बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. 
                        विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. पूर्व विदर्भातील कार्यकर्त्यांशी हितगुज करणे. तसेच वंचित बहुजन आघडीकरिता उमेदवार चाचपणीसाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे रवी भवन कॉटेज क्रमांक ३० मध्ये आगमन झाले होते. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी हितगुज केले. तथा पूर्व विदर्भ अध्यक्ष, जिल्हा निरीक्षक व जिल्हा पदाधिकाऱ्यांशी काही विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची चाचपणी केली. जिल्ह्यातील काही आंबेडकरी चळवळीशी तिळमात्र संबंध नसणाऱ्या १० ते १२ व्यक्तींकडून गटातटात विखुरलेल्या रिपब्लिकन पक्षांच्या एकत्रीकरणासाठी प्रयत्न केले जात असून त्या करिता सुरुवातीला "एकिकृत् रिपब्लिकन समिती भंडारा" तयार करून या समिती अध्यक्षाने सर्वच रिपाई गटाच्या अध्यक्षांशी चर्चा करून नागपूर येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीला वंचित वगळता सर्वच पक्षाचे राज्यअध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते. असे आयोजकांचे म्हणणे आहे. या बैठकीत सर्व आंबेडकरवादी गटांनी एकत्र मिळून विधानसभेच्या निवडणुका लढवू, असा ठराव पारित केला होता. तसेच एकत्रीकरणाबाबद सर्व गटांच्या राष्ट्रीय गटांची मुंबई येथे बैठक घेण्याचे ठरविले होते. मुंबईतील बैठकीला बीआरएसपी वगळता कोणीही उपस्थित झाले नाही. 
                        रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रयत्न करणारे प्रस्थापित मनुवद्यांचे हस्तक असून ते रिपब्लिकन पक्ष गटातटात विखुराल्याचे भासवून अप्रत्यक्षपणे प्रस्थापित पक्षांना मदत करीत आहेत. या प्रकाराने आंबेडकर चळवळीचे नुकसान होणार आहे. वास्तविकत: राज्यात वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पार्टी सोडल्यास कोणत्याही स्वतःला आंबेडकरवादी समजणाऱ्या पक्षांचा जनाधार नाही. सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी लाचारी पत्करली असून पद उपभोगण्यात व्यस्त आहेत. त्यांना आंबेडकरी समाजाशी काही देणेघेणे नाही. असे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. भंडारा येथील एकिकृत रिपब्लिकन समिती चे पदाधिकारी व नागपुरातील काही असंतुष्टांनी आता "संयुक्त रिपब्लिकन एकीकरण समिती विदर्भ" गठित करून परत एका रिपब्लिकन गटाची निर्मिती केली असल्यामुळे यांना प्रामाणिकपणे रिपब्लिकन पक्षाचे एकीकरण हवे आहे काय ? असा प्रतिप्रश्न ॲड. बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. राज्यात आंबेडकरी विचारधारेशी बांधील असलेल्या वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पार्टीचाच जनाधार असून बसपा सुप्रीमो एकीकरणास तयार असतील तर आमचीही चर्चेची तयारी आहे. असे वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो ॲड. बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच एकिकरणाचे नावाखाली आंबेडकरी जनतेची दिशाभूल करणाऱ्यापासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या