ग्रामीण भागात वाढलाय डान्स हंगामाचा क्रेझ
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :-जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या मंडईचा जल्लोष सुरु आहे. गावागावात मंडई निमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, यात कार्यक्रम लावणीचा आणि होतो डान्स हंगामा असा प्रकार सुरू आहे. यासाठी गावातील काही आंबटशौकीनांकडून छत्तीसगडी डान्स हंगामाचे आयोजन केले जाते. या करमणूक व मनोरंजनाच्या नावाखाली अश्लिलता आणि बिभत्स नृत्याचा खेळ सध्या जोमात सुरू आहे.
दिवाळीच्या पावन पर्वावर झाडीपट्टीतील भंडारा, गोदीया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बहुसंख्य असलेला शेतकरी आपली शेतीची कामे जेमतेम आटोपून जरा मोकळा होत असतो आणि त्याचा आनंद साजरा करण्यादृष्टीने गावागावात मंडई व त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असे. मुक्कामी पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने येतात त्यांच्या मनोरंजांनासाठी दंडार, नाटक, कव्वाली, लावण्या असे विविध कार्यक्रमआयोजीत करून गावातील नागरिक तसेच पाहुणे मंडळी कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. मात्र ग्रामीण भागात डान्स हंगाम्यावर बंदी असल्याने लावणीच्या नावाखाली सर्रास डान्स हंगाम्याचे कार्यक्रम सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. डान्स हंगाम्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनकडून परवानगी मिळत नसल्याने लावणीचे नाव सांगून परवानगी मिळवली जाते. मागील काळात जिल्ह्यात डान्स हंगाम्याच्या नावाखाली रंगमंचावर अश्लीलतेचे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात सुरु होते. याकडे युवा वर्ग मोठ्या संख्येने आकर्षीत होत असे दरम्यान काही ठिकाणी अनुचित घटना घडल्याने प्रशासनाने या कार्यक्रमांवर बंदी घातली होती. परंतु लावणीचे नाव देऊन पुन्हा मंडई निमीत्त गावागावात या कार्यक्रमाची धुम सुरु असल्याचे दिसत आहे. अशा हंगाम्यात पैशाच्या मोहासाठी अश्लिलतेचे प्रदर्शन केले जाते. याकडे मात्र युवा तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षीत होतो. या कार्यक्रमात गोंधळ व हुल्लडबाजी केली जाते. त्यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. डान्स हंगामा कार्यक्रमाच्या नावाखाली स्टेजवर प्रेक्षकांच्या समोरच अत्यंत अश्लील नृत्य केली जातात. या माध्यमातून आयोजकांना तसेच प्रस्तुती करणाऱ्यांनाही चांगली आवक होते. मात्र, यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची तसेच शांतता व सुरक्षा व्यवस्था बिघडण्याची शक्यता असताना असे आयोजन गावोवावी केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे पोलिस प्रशासनाने सध्या ग्रामीण भागात धुमधडाक्यात सुरु असलेल्या मंडई निमीत्त आयोजित कार्यक्रमावर विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
0 टिप्पण्या