Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव निश्चित, सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग

दिल्लीतील महत्त्वपूर्ण बैठकांनंतर मुख्यमंत्रीपदावर चर्चा ठरली; 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांचे सूत्र कायम

चित्रा न्युज ब्युरो
मुंबई :-महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असून, मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या संदर्भात सोमवारी रात्री फडणवीसांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत सत्तावाटपाचे अंतिम स्वरूप ठरविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानुसार, आगामी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सांभाळतील, तर उर्वरित अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे राहील. शिवाय, राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचे सूत्र कायम ठेवण्यात येणार आहे. या सत्तावाटपात प्रत्येक पक्षाला 6-7 आमदारांमध्ये एक मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीला महत्त्वाचे स्थान असून, या बैठकीत सत्तावाटपावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

सध्याच्या सत्तास्थापनेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) एकत्रित सरकार कार्यरत आहे. या तीन पक्षांमध्ये सत्तेचे विभाजन होत असून, मंत्रिमंडळातील पदे वाटप करण्यासाठी स्पष्ट नियम ठरवण्यात आले आहेत.

न्यायालयीन प्रक्रियांचा आणि सत्तावाटपातील घटनेच्या तरतुदींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्रीपदाचा हा निर्णय विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर अधिकृतरीत्या जाहीर होईल.

सत्ताधारी गटाच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे. हा निर्णय राज्याच्या विकासाला पूरक ठरेल की सत्ता टिकवण्यासाठीच घेतला आहे, यावर विविध मतप्रवाह उमटत आहेत. दरम्यान, नव्या नेतृत्वामुळे राज्याच्या प्रलंबित समस्यांवर प्रभावी निर्णय होण्याची अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या