हर जोर जुल्म की टक्कर मे संघर्ष हमारा नारा है।’ अशी घोषणा देत सुरु केलेल्या भारतीय दलित पँथरने-
पोटात तुझ्या पेटली आग
उठ दलिता तोफा डाग
अशी हाक देऊन सर्व महाराष्ट्रातील आंबेडकरी युवकांना ‘पँथर’ बनविणारे लढाऊ संघटन म्हणजे ‘भारतीय दलित पँथर!’ सळसळत्या रक्ताच्या तरुण क्रांतिकारी पँथर्सना सोबत घेऊन दलितांवर होणार्या अन्याय-अत्याचारांविरोधात बंड पुकारताना ‘जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो’ची आक्रमक घोषणा देत ‘भारतीय दलित पँथर’चे ज्वालाग्रही वादळी आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे आलेले नाव म्हणजे रामदास आठवले!
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आपल्या प्राणप्रिय मुक्तिदात्याचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात नामांतर आंदोलन उभे राहिले. प्राण तळहातावर घेऊन नामांतरासाठी राज्यभर गावागावांत लढत फिरणारा अवलिया म्हणजे रामदास आठवले होत. आठवलेंनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात ‘लाठी गोली खायेंगे फिर भी आगे जायेंगे’ची घोषणा देत पोलिसांचा लाठीमार सहन करून प्रसंगी तुरुंगवास भोगला. आंबेडकरी चळवळीत जीवाची बाजी लावून लढत ‘रामदास आठवले’ नावाचा संघर्षनायक घडला. आंबेडकरी चळवळीचे भाग्य आहे की, रामदास आठवलेंसारखा झुंजार योद्धा या चळवळीचा शीर्षस्थ नेता म्हणून लाभला. ‘संघर्ष का दुसरा नाम रामदास आठवले हैं।’ असं त्यांच्याबद्दल म्हंटलं जातं. एवढा संघर्ष करून तावून-सुलाखून निघालेले नेते म्हणजे रामदास आठवले!
१९९० मध्ये ‘भारतीय दलित पँथर’ ही संघटना बरखास्त करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे काम रामदास आठवलेंनी सुरु केले. १९९० मध्ये रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपाइंने ‘काँग्रेस आय’ला पाठिंबा देऊन विधानसभा निवडणूक लढली. त्या निवडणुकीत रामदास आठवलेंच्या नेतृत्वामुळे काँग्रेसला आंबेडकरी जनतेचे मतदान मिळाले. त्यामुळे काँग्रेसच्या ३५ जागा अधिक जिंकून आल्याची जाहीर कबुली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिली होती. अत्यंत खडतर प्रवास आणि व्यवस्थेशी संघर्ष करणारा आपला ‘पँथर’ महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री झाला याचे संपूर्ण देशात कौतुक झाले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ संपूर्ण देशात वाढविण्याचे रामदास आठवले काम करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ’दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या अध्यक्षपदी मंत्री रामदास आठवले यांची निवड झाली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’ या आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेचे संस्थापक-सदस्य होते. त्या आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेच्या जागतिक उपाध्यक्षपदी रामदास आठवले यांची सेऊल येथे निवड करण्यात आली होती. सवर्णांना आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात यावे, ही भूमिका घेऊन त्यांनी देशभर सवर्णांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देऊन दलित-सवर्ण एकजुटीसाठी प्रयत्न केले.
महाराष्ट्रात शिवशक्ती-भीमशक्ती एकजूट करुन दोन समाजातील दरी मिटविण्याचा प्रयत्न केला आहे. रामदास आठवले महाराष्ट्रात पाच वर्षे कॅबिनेट मंत्री राहिले. त्यानंतर सन १९९८ मध्ये धारावी-दादर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा खासदार झाले. त्यानंतर १९९९ आणि २००४ मध्ये पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार निवडून आले. म्हणजे तीन वेळा लोकसभेत ते खासदार होते. त्यानंतर २०१४ साली ते राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवडून आले.
कायम लोकांच्या गर्दीत राहणारा लोकनेता म्हणून रामदास आठवले यांचा जागतिक विक्रम होईल. दिवसरात्र देशभर कोणत्याही शहरांत, गावांत त्यांचा दौरा असू द्या, ते सत्तेत असोत की नसोत, लोक मात्र कायम रामदास आठवलेंभोवती गर्दी करतात. कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारे, त्यांच्या सुखदुःखात सामील होणारे रामदास आठवले प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत.
एवढी लोकांची सेवा ते करीत असल्याच्या फलस्वरूपात जुलै २०१६ साली ते भारत सरकारमध्ये पहिल्यांदा केंद्रीय राज्यमंत्री झाले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर रामदास आठवले हे केंद्रीय मंत्रिमंडळात पोहोचणारे पहिले भीमसैनिक ठरले. दि. २५ डिसेंबर संघर्षनायक रामदास आठवले यांचा वाढदिवस देशभर ‘संघर्ष दिन’ म्हणून रिपाइंतर्फे साजरा होतो. संघर्ष, संयम आणि धैर्याचे महामेरू ठरलेल्या संघर्षनायक रामदास आठवले यांना देशसेवेसाठी उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो ही मनःपूर्वक शुभेच्छा! जयभीम!
हेमंत रणपिसे
(लेखक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)चे प्रसिद्धी प्रमुख आहेत)


0 टिप्पण्या