Ticker

6/recent/ticker-posts

तहसीलदाराचा मनाई आदेश असतानाही शेतजमिनीची रजीस्ट्री


• दुय्यम निबंधक साकोली यांचा अफलातून कारभार 

• प्रकरण जांभळी/सडक येथील गट क्रमांक ९६ चे 

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- तलाठी साझा क्रमांक १३, मौजा जांभळी/सडक येथील गट क्रमांक ९६ आणि गट क्रमांक ९५ चा सीमावाद असल्यामुळे हा वाद मिटविण्यासाठी गट क्रमांक ९६ ची नोंदणी(रजीस्ट्री) करण्यात येऊ नये. असे तहसीलदार साकोली यांचे पत्र क्रमांक मह./प्रस्तू-१/कावी-३८५/२०२४ दिनांक १ जुलै २०२४ नुसार गट क्रमांक ९६ आराजी ०.८१ हेक्टर आर ह्या शेतजमिनीची विक्रीची नोंदणी(रजीस्ट्री) करण्यात मनाई करण्याबाबदचे दुय्यम निबंधक साकोली यांना तहसीलदार साकोली यांनी रीतसीर आदेश दिले असताना सुद्धा दुय्यम निबंधकाने या आदेशाला केराची टोपली दाखवून ४ ऑक्टोबर २०२४ रोजी सदर वादग्रस्त गट क्रमांक ९६ ची नोंदणी(रजीस्ट्री) केल्याने तहसीलदार साकोली कडून दुय्यम निबंधकावर काय कारवाई केली जाते याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. 
                       गट क्रमांक ९६ मौजा जांभळी/सडक, तलाठी साझा क्रमांक १३ तालुका साकोली ही शेतजमीन १९७०-७१ मध्ये येथील रहिवासी नसणाऱ्या इसमास बनावट दस्ताऐवजाचे आधारे वाटप दाखविण्यात आली होती. त्यांचे मृत्यू पश्चात वारसानचे नाव सातबारावर चढविण्यात आले. पण मृतक व त्यांचे वारसान यांनी या शेतजमिनीत पीकपाणी लावले नाही किंवा त्यांचे कब्ज्यातही नव्हती. लगतच्या गट क्रमांक ९५ चे शेतकऱ्याचे हक्क व वापर तसेच कब्ज्याबाबद नकाशा आणि वापराबाबद वाद असून गट क्रमांक ९६ आराजी ०.८१ हेक्टर आर ऐवजी मौक्यावर फक्त ०.४० हेक्टर आर अस्तित्वात आहे. खोट्या दस्ताऐवजाचे आधारे शासनाकडून मिळालेली शेती, चुकीचा आणि दिशाभूल करणारा ७/१२, गाव नमुना ८, नकाशा, फेरफार पंजी सादर करून वर्ग २ ची हस्तांतरणास मनाई असलेली शेती वादग्रस्त असताना सुद्धा विक्री करण्याच्या दुष्ट हेतूने वर्ग १ करण्याचा आदेश मिळविण्यात आला. 
                       गट क्रमांक ९६ आणि गट क्रमांक ९५ चा ०.४० हेक्टर आर ची सीमा लगत असल्यामुळे वाद मिटविण्यासाठी गट क्रमांक ९६ च्या विक्रीची नोंदणी(रजीस्ट्री) होऊ नये. या बाबद तहसीलदार साकोली यांनी १ जुलै २०२४ रोजी मनाई आदेश काढून दुय्यम निबंधक साकोली यांचेशी रीतसीर पत्र व्यवहार करून नोंदणीकृत विक्री पत्र करतांना सहनिशा करावी. तसेच उपरोक्त प्रकरणी तक्रारीचे अनुषंगाने कार्यवाही करतांना दक्षता घ्यावी. जेणे करून त्यांच्या नैसर्गिक न्यायाचे हनन होणार नाही. असे सूचित करून या मनाई आदेशाची प्रतीलीपी मंडळ अधिकारी साकोली व तलाठी साझा क्रमांक १३ बोदरा यांना निर्गमित केली होती. दुय्यम निबंधक साकोली यांनी कसलीही पडताळणी न करता तहसीलदार साकोली यांचे पत्रास केराची टोपली दाखवून अर्थकारण करून ४ ऑक्टोबर २०२४ रोजी नोंदणी(रजीस्ट्री) केल्याने नियमबाह्य काम केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश न पाळता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वादग्रस्त शेतजमिनीची रजीस्ट्री केल्याप्रकरणी दुय्यम निबंधकावर काय कारवाई केली जाते. याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. 
*काबिलकास्तही वर्ग १ मध्ये परिवर्तित(चौकट)*
मौजा जांभळी/सडक येथील गट क्रमांक ९६ आराजी ०.८१ हेक्टर आर शेतजमीन १९७०-७१ मध्ये राघोबा मंगरू नंदनवार यांना तहसीलदार साकोली यांचे आदेशान्वये काबिलकास्त जमीन भुमिधारी हक्काने देण्यात आली असताना सुद्धा वर्ग १ मध्ये परावर्तित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या