चित्रा न्युज ब्युरो
सोलापूर :-31 डिसेंबर हा दिवस तरुणांमध्ये दारू पिण्याची फॅशन बनत चालला आहे. या व्यसनामुळे तरुणांचे आयुष्य बरबाद होऊन कुटुंबाचे आणि देशाचेही नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून आनंद काशीद यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षांपासून "दारूच्या ऐवजी दूध प्या" हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे संभाजी ब्रिगेड मोफत दुधाचे वाटप करून तरुणांना व्यसनमुक्त राहण्याचा संदेश देते.
यावर्षीचा "दारू नको, दूध प्या" हा कार्यक्रम 31 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता श्री शिवाजी महाविद्यालयासमोरील मैदानात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन परीक्षेत्रीय विभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी श्री. जालिंदर नालकुल यांनी संभाजी ब्रिगेडच्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले, "तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत. भविष्यात आम्हीही अशा स्तुत्य उपक्रमांमध्ये सहभागी होऊ."
बार्शी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बालाजी कुकडे यांनीही या कार्यक्रमाचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी म्हटले, "तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम संभाजी ब्रिगेड करत आहे. हे कार्य समाजहिताचे असून याची दखल भविष्यात नक्की घेतली जाईल."
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष बालाजी डोईफोडे, विक्रम बापू घाईतिडक, रवींद्र मुठाळ, शोएब भाई सय्यद, इंजिनिअर विनोद कुमार मिसाळ, दिगंबर रणखांब, सचिन शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कार्यक्रमादरम्यान "दारू नको, दूध प्या" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. तरुणांनी या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला.
संभाजी ब्रिगेडच्या या उपक्रमाने दारूमुळे होणारे नुकसान रोखून, तरुणांना सकारात्मक जीवनाची दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. "दारू नको, दूध प्या" हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे हे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे.


0 टिप्पण्या