लाखनी-सालेभाटा-उमरझरी-तिरोडा रस्त्यावरील प्रकार
दुचाकी चालकांना पाठ व कंबरेचा त्रास
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे डोळेझाक करीत तसेच इंडियन रोड काँग्रेसचे नियम धाब्यावर बसवून अनावश्यक ठिकाणी गतिरोधक तयार केल्याने वाहन चालकांना अकारण त्रास सहन करावा लागतो. तर ओबडधोबड गतिरोधकामुळे दुचाकी चालकांना पाठीचा कणा व कंबरेचा त्रास होत आहे. तसेच गतिरोधकावर पांढरे पट्टे नसल्यामुळे गतिरोधक वाहन चालकांच्या लक्षात येत नसल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. राजमार्ग प्राधिकरणाने दखल घेऊन लाखनी-सालेभाटा-उमरझरी-तिरोडा या रस्त्यावरील गतिरोधक व्यवस्थित करण्याबाबद संबंधित यंत्रणेला निर्देश देण्याची मागणी होत आहे.
नक्षलग्रस्त परिसरातील जनतेला आवागमनाची सोय व्हावी. या करिता लाखनी-सालेभाटा-उमरझरी-तिरोडा ह्या इतरजिल्हा मार्गाची मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत निर्मिती करण्यात आली. या रस्त्यावर लाखनी, संजयनगर, लाखोरी, मासलमेटा, सालेभाटा, मोरगाव, मुंडीपार, किन्ही, बाम्पेवाडा, शिवनटोला, उमरझरी, तिरोडा रस्त्यावर गावे येत असून या गावालगत तयार करण्यात आलेले गतिरोधक नियमांना हरताळ फासत उभारण्यात आले असून लांबी रुंदीचे कसलेही निकष पाळण्यात आले नसल्यामुळे अपघाताच्या घटना वाढल्या असल्या तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गतिरोधकांमुळे वाहन चालकास त्रास होऊ नये, वेगावर नियंत्रण राहावे. तथा अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या करिता गतिरोधक तयार केले जातात. पण लाखनी-सालेभाटा-उमरझरी-तिरोडा रस्त्यावरील गावालगत गतिरोधक तयार करतांना नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे. याचा फटका वाहन चालकांसह प्रवाश्यांना बसत असून अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली असल्याचे गावकऱ्यांचे म्हणने आहे.
गतिरोधक तयार करतांना इंडियन रोड काँग्रेस कडून नियमावली आखून दिली आहे. या नियमांचे पालन करूनच गतिरोधक तयार करायचे असतात. गतिरोधकाची उंची किती असावी व दोन्ही बाजूला उतार कसा असावा. या बाबदची स्पष्ट माहिती दिली गेली असताना यास बगल दिल्याने अनेकांना पाठ व कंबर दुखीचा त्रास होत आहे. पण या रस्त्यावर नियमांना बगल देऊन तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे डोळेझाक करून अनेक ठिकाणी गतिरोधक उभारले असून लाखनी ते उमरझरी या २० किलोमीटर च्या अंतरात तब्बल ३५ ते ४० गतिरोधक असून उंची अशास्त्रीय असल्याने वाहन चालकांना त्रासदायक ठरून अपघाताची शक्यता असल्याने या रस्त्यावरील नियमाप्रमाणे गतिरोधक तयार करण्यात यावे. अशी प्रवाश्यांसह परिसरातील जनातेकडू मागणी होत आहे.


0 टिप्पण्या