अवैध जनावर वाहतूक उघड, दोन संशयित ताब्यात
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-पंढरपूर शहरातील मटण मार्केट परिसरात विनापरवाना आणि अमानुष पद्धतीने बैल वाहतूक करत असलेल्या दोन संशयितांना पंढरपूर शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत 10 खिलार जातीचे बैल आणि आयशर टेम्पो असा एकूण 10 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
जय अशोक सुरवसे (वय 21, रा. अंबाबाई पटांगण, जुना सोलापूर रोड, पंढरपूर) हे गोरक्षक आणि प्राणीमित्र आहेत. दिनांक 30 मार्च रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या मोटारसायकलवरून अर्बन बँकेकडून घराकडे जात असताना मटण मार्केटजवळ त्यांनी एक आयशर टेम्पो (MH-14/HG-0106) संशयास्पद स्थितीत पाहिला. स्पीड ब्रेकरवर आदळल्याने टेम्पोतून जनावरांच्या टापांचा आवाज आल्याने त्यांनी टेम्पोला थांबवून तपासणी केली.
टेम्पोचालकाने टेम्पो मोकळा असल्याचा दावा केला. मात्र, जय सुरवसे यांनी टेम्पोच्या मागील भागाची पाहणी केली असता, तो ताडपत्री आणि दोरीने बांधलेला दिसला. संशय वाढल्याने त्यांनी गोरक्षक मित्र प्रमय अभंगराव, गोपाळ सुगंधी, अवधुत घाटे आणि श्रीराम उत्पात यांना बोलावून घेतले. टेम्पो उघडल्यानंतर त्यात 10 मोठे, पांढऱ्या रंगाचे खिलार जातीचे बैल दाटीवाटीने कोंबून वाहतूक करत असल्याचे आढळले.
सुरवसे यांनी तात्काळ डायल 112 वर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही वेळातच पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे दोन अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गाडीतील ताडपत्री काढून बैलांची तपासणी केली. वाहनाच्या चालकाने आपले नाव अरबाज सय्यद मोमीन (वय 18, रा. खर्डा रोड, जामखेड, जि. अहिल्यानगर) तर सहकारी जमीर मुस्तफा कुरेशी (वय 27, रा. जामखेड) असल्याचे सांगितले.
संशयितांनी बैल जामखेड बाजारातून सांगोला बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्याकडे जनावरांची वाहतूक परवानगी, खरेदी-विक्री पावती, तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र नव्हते. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, मोटर वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
10 खिलार जातीचे बैल – अंदाजे किंमत ₹2,00,000/-
आयशर टेम्पो (MH-14/HG-0106) – अंदाजे किंमत ₹8,00,000/-
एकूण जप्त माल – ₹10,00,000/-
या कारवाईत पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार चंदनशिवे (पोहेकॉ/1566) आणि तपास अधिकारी पोलीस हवालदार सर्जे (पोहेकॉ/2041) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


0 टिप्पण्या