Ticker

6/recent/ticker-posts

उद्योगांना सोईसुविधा व सवलती देण्यासाठी शासन कटीबद्ध उद्योगांसाठी रावेर येथील 2 हजार एकर जमीन उपलब्ध करुन देणार:महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे


उद्योजकांनो या, गुंतवणूक करा, तुमच्यासाठी धुळ्यात असणार रेड कारपेटने स्वागत..
:पालकमंत्री जयकुमार रावल

• गुंतवणूक परिषद ठरणार धुळे जिल्ह्यासाठी गेमचेंजर

• परिषदेमध्ये 8436 कोटींचे गुंतवणूक करार, 11506 रोजगार उपलब्ध होणार रोजगार 

• औद्योगिक गुंतवणूक परिषद उत्साहात संपन्न

 चित्रा न्युज प्रतिनिधी 
धुळे: राज्यात उद्योगांच्या माध्यमातून गुंतवणूक वाढण्यासाठी राज्य शासनाचे प्राधान्य आहे. या उद्योगांना आवश्यक त्या सोईसुविधा व सवलती देण्यासाठी राज्य शासन कटीबध्द आहे. धुळयातील गुंतवणूक परिषदेत झालेले 8436 कोटी रुपये गुंतवणूकीचे करार हे जिल्ह्यासाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक आकर्षिंत करुन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्याच्या उद्योग संचालनालयाच्यावतीने  हॉटेल टॉपलाईन रिसॉर्ट, धुळे येथे एक दिवसीय औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी मंत्री श्री. बावनकुळे बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल होते. या कार्यक्रमास खासदार डॉ शोभा बच्छाव, आमदार सर्वश्री काशिराम पावरा, श्रीमती मंजुळा गावीत, अनुप अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, नाशिक विभागाच्या उद्योग सहसंचालक वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांचेसह विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक, गुंतवणूकदार उपस्थित होते.  

महसूलमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, धुळे जिल्हा हा संस्कार, संस्कृती, किर्तीच्या शिल्पकलाकारांचा, इतिहासकाराचा, संशोधकाचा, कलावंताचा जिल्हा असून अनेक अष्टपैलू कर्तुत्वाचे लोक जिल्ह्याने दिले आहे. जिल्ह्याची माती ही नतमस्तक होणारी माती आहे. जिल्ह्यात उद्योग व्यवसायिकांसाठी खुप वाव आहे. आणि त्यामुळं ह्या जिल्ह्यामध्ये जी गुंतवणूक होत आहे ते अतुलनीय आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प केला आहे. त्यामुळे भविष्यात भारत हा जगातला सर्वात मोठा उद्योजकता निर्माण करणारा देश होणार आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी उद्योजकांसाठी विविध सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. सद्या आपल्याला कमर्शियल ग्राहकांकडून क्रॉस सबसीडी घेऊन शेतकऱ्याला वीज देतो. पुढच्या तीन वर्षांमध्ये राज्यातील 45 लाख शेतकरी सोलर उर्जेवर शिफ्ट होणार असल्याने यापुढे उद्योजकांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करुन देण्यास मदत होणार  आहे.

ते पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. त्यानुसार दावोसमध्ये 15 लाख कोटी रुपयांचे करार केले आहे. धुळे जिल्ह्यात उद्योगांसाठी रावेर येथील 2 हजार एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. तसेच राज्यात कुठलेही बांधकाम करण्यासाठी आता नदीची वाळू (नैसर्गिक रेती) लागणार नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दगडापासून रेती तयार करण्याचे 50  क्रेशरला मंजूरी देण्यात येणार आहे. येत्या काळात साक्रीला औद्योगिक विकास महामंडळ, तसेच धुळ्यात ड्रायपोर्टसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच सर्व उद्योजकांना सर्व परवानग्या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. 

ते पुढे म्हणाले की,  आम्हाला विधानमंडळ आणि मंत्रालय समजायला तीन वर्ष लागले. आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी सहा महिन्यांत समजून घेतले. आणि त्यांनी आपल्या सामाजिक कामाची छाप पाडली आहे. धुळे जिल्ह्यास पालकमंत्री जयकुमार रावल यांचा सारखा लोकप्रिय, अष्टपैलुत्व व्यक्तिमत्त्व असणारा पालकमंत्री लाभला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

उद्योजकांनो धुळ्यात या, गुंतवणूक करा, तुमचे रेड कार्पेटने स्वागत आहे-पालकमंत्री

धुळे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या, पायाभूत सुविधांनी युक्त जिल्हा आहे. उद्योग उभारण्यासाठी राज्यातील एक उत्तम डेस्टिनेशन असलेला धुळे जिल्हा आहे. मुबलक रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा तसेच कुशल-अकुशल मनुष्यबळ, रोड, एअर, रेल्वे, पोर्ट या सर्व कनेक्टिव्हिटी, उद्योगांना लागणारा कच्चा माल, उद्योगांना संरक्षण व त्याची भविष्यातील सुरक्षितता या सर्वच बाबतील सक्षम असल्याने उद्योजकांनो धुळ्यात या, गुंतवणूक करा, तुमचे रेड कार्पेटने स्वागत असलयाचे आवाहन पालकमंत्री श्री. रावल यांनी यावेळी उद्योजकांना केले. धुळे हे ठिकाण गुजरात, मध्य प्रदेश या राज्याच्या केंद्रस्थानी आहे. दोन्ही राज्यांच्या सीमा धुळे जिल्ह्याला लागून असल्याने एक मोठा फायदा उद्योग वाढीसाठी आहे. सात राष्ट्रीय महामार्ग धुळे जिल्ह्यातून जातात. धुळे जिल्हा हा उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम भारताला जोडणारा महत्त्वाचा जिल्हा आहे. यामुळे उद्योजकाला आपला माल देशात कुठेही ट्रान्सपोर्ट करायचा असेल किंवा कच्चा माल आणायचा असेल तर त्याला सहज आणि सुलभ हे ठिकाण आहे.

पूर्वीच्या काळी धुळे जिल्हा हा मुंबईपासून दूर वाटत होता. परंतु, काळाच्या ओघात हायवे आले. द्वारकेपासून तर बंगालपर्यंत प्रवास करायचा असेल तरी धुळे जिल्ह्यामधून जावं लागतं आणि काश्मीर पासून कन्याकुमारी जायचं असेल, तरी धुळे जिल्ह्यातूनच जावं लागत. म्हणून अत्यंत स्ट्रॅटजिक लोकेशनवर असलेला धुळे जिल्हा आहे. ज्याच्या माध्यमातून कच्च्या मालाला आणण्यासाठी, त्याचबरोबर आपला माल पाठविण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध आहे. दरवर्षी 10 हजार कोटी रुपयाची निर्यात धुळ्यातून होते. राज्य सरकारच्या विविध योजना, प्रकल्प खान्देशात राबविण्यात यावेत असे त्यांनी सांगितले. येथील उद्योजकांना 24 तास येथील अधिकारी, लोकप्रतिनिधी मदतीसाठी उभे राहतील तसेच सर्व प्रकारचे सहकार्य त्यांना करण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

आमदार अग्रवाल म्हणाले की, जिल्ह्यात सुलवाडे जामफळ, अक्कलपाडा, मनमाड इंदौर रेल्वे मार्ग हे प्रकल्प माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाले आहे. तसेच धुळ्यात कुशल अकुशल मजूरांची उपलब्धता आहे, धुळ्यात अनेक उद्योजक व्यवसाय करण्यास इच्छुक असल्याने रावेर येथे एमआयडीसीसाठी 2 हजार एकर जागा, तसेच ड्रायपोर्टसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

प्रशासन नेहमीच उद्योजकांच्या पाठीशी उभे - जिल्हाधिकारी

धुळे जिल्ह्यात होत असलेली औद्योगिक गुंतवणूक परिषद जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याने उद्योगांच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी दरमहा उद्योजकांसोबत बैठक घेणार आहे. धुळ्यात उद्योजकांना सुरक्षिततेची हमी तसेच ॲग्रीकल्चर, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस सेक्टरला जिल्ह्यात पोषक वातावरण आहेत. धुळे जिल्हा हा केंद्रस्थानी जिल्हा आहे. वाहतुक, दळणवळणासाठी राष्ट्रीय महामार्ग आहे, मनमाड इंदूर रेल्वेमार्गाचे काम सुरू होत असल्याने देशाचा उत्तर दक्षिण भाग जोडला जाणार आहेत. त्याच प्रमाणे आयात निर्यात करण्यासाठी वाढवण, जेएनपीटी बंदर जवळ आहे. नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, शिर्डी, इंदूर एअरपोर्ट दोन तासाच्या अंतरावर आहेत. तसेच येत्या काळात ड्रायपोर्ट उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. साक्री येथे इथेनॉल प्लॅन्ट, दोडाईचा येथे फुड अॅन्ड फार्मा पार्क, ऑईल, पॉवरलूम, टेक्सटाइल उद्योग आहेत. 700 टन ऑरगॅनिक कॉटनचे उत्पादन होत आहे. येथील उद्योगांना 70 ते 80 टक्के सबसिडी मिळत आहे. तसेच कुशल अकुशल मनुष्यबळ असे पोषक वातावरण जिल्ह्यात असल्याने जास्तीत जास्त उद्योजकांनी धुळ्यात गुंतवणूक करावी असे आवाहनही त्यांनी केले. 

उद्योग सहसंचालक श्रीमती वृषाली सोने यांनी राज्याच्या उद्योग धोरणानुसार 2023 पर्यंत गुंतवणूक उद्दिष्टे गुंतवणूक परिषदांच्या माध्यमातून साध्य करण्याचा मानस आहे. जिल्ह्यात अनेक उद्योगांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ या क्षेत्रातील उद्योजकांना कसा घेता येईल, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी मैत्रीचे नोडल अधिकारी उमेश पाटील, स्वप्नील केंद्रे, यांनी मैत्री पोर्टल संबधी मार्गदर्शन केले. सहायक आयुक्त (तांत्रिक) गणेश वंडकर यांनी टेक्सटाइल पॉलिसी 2023-28  संदर्भात माहिती दिली. उपप्रकल्प संचालक नितीन पाटील यांनी महाराष्ट्र कृषी व्यवसाय नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाच्या योजनेवर, निर्यातदार राजेंद्र जाखडी यांनी जिल्ह्यातील निर्यातीच्या संधी, व्यवसाय विकास प्रमुख यांनी एसएमई एक्सचेंजमध्ये एमएसएमई लिस्टिंगबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शांती स्पिन्टेक्स लिमिटेड 1 हजार कोटी, एच.डी. वायर प्रा.लि. 2 हजार कोटी, बेदमुथा इंडस्ट्रीज लिमिटेड 460 कोटी, सनस्टॉर लिमिटेड 320 कोटी,  आशिर्वाद इलेक्ट्रॉनिक्स 20 कोटी, पियुष लाईफस्पेस प्रा. लि. 110 कोटी यासह 119 विविध कंपन्यांचे 8436 कोटी 41 लाख रुपंयाचे सामंजस्य करार करण्यात आला. यातून 11506 जणांना रोजगार निर्मिती होणार आहे.

या परिषदेला मध्यप्रदेश, गुजरात राज्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील उद्योजक, गुंतवणूकदार, निर्यातदार, व्यापारी, तसेच इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या