चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि ज्यांना चळवळीचे चालतं बोलतं विद्यापीठ म्हटले जाते असे वसंतदादा साळवे यांचा वाढदिवस "महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा आणि नागरिकांच्या पुढील आव्हाने" या विषयावर व्याख्यानाने साजरा झाला. या कायद्यामुळे पुढील धोके, आव्हाने याविषयी लोकांना सांगण्यात आले.
सावित्रीबाई फुले सभागृह, महात्मा फुले पेठ, पुणे येथे ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. प्रियदर्शी तेलंग, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे होते, कार्यक्रमाचे संयोजन वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर संघटक नागेश भोसले यांनी केले होते.
सदर व्याख्यानमालेला मोठा प्रतिसाद मिळाला. पुणे शहर जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्या सर्व कार्यकर्त्यांनी वसंतदादा यांना भेटून शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर अशा प्रकारचे व्याख्यान केल्यामुळे लोकांनी संयोजकाचे आभार मानले.
'महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा' येऊ घातलेला आहे त्याच्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केल्याबद्दल आहे समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन वाड्या, वस्त्यांमध्ये आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्र निस्वार्थ भावनेने कार्य करणारे वसंतराव साळवे हेच खरे आंबेडकरी चळवळीचे ऊर्जास्त्रोत आहे असे गौरवोद्गार व्याख्याते फारूख अहमद यांनी काढले.
सत्काराला उत्तर देताना वसंतदादा साळवे म्हणाले की, सध्या स्वतःच्या कवड्या स्वतःच्या हातात ठेवून लढले पाहिजे. स्वतःच्या कवड्या इतरांकडे दिल्या, तर त्या कवडीमोल झाल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्यातील आंबेडकरी बाणा हा शेवटपर्यंत तेवत ठेवला पाहिजे.
या प्रसंगी सुरेखा साळवे, रोहिदास गायकवाड, अंकल सोनवणे, मोहन वाडेकर, शैलेंद्र चव्हाण, जांबुवंत मनोहर, राहुल नागटिळक, श्याम गायकवाड, सुजित यादव, बाळासाहेब वाघमारे, विश्वास गदादे पाटील, विकास भेगडे पाटील, अनिता चव्हाण, बाबासाहेब गायकवाड व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक संतोष संखद यांनी केले, तर आभार राजेंद्र कांबळे यांनी मानले.


0 टिप्पण्या