चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:-बार्शी शहरातील ताडसौदणे रोडवरील एका पानटपरीच्या आडोशाला चोरी करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या दोन संशयितांना बार्शी शहर पोलिसांच्या रात्रगस्त पथकाने ताब्यात घेतले आहे. हा प्रकार ९ एप्रिल रोजी पहाटे १२.२० वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिस नाईक अविनाश धिरु पवार (पोकॉ/७८७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १२२(क) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिस नाईक पवार हे पोहेकॉ कदम, पोना सुरवसे, पोकॉ नितनात, माने आणि वाघमोडे यांच्यासह बार्शी शहरात रात्रगस्त करत होते. त्या वेळी ताडसौदणे रोड परिसरात त्यांना दोन अनोळखी इसम पानटपरीच्या आडोशाला बसलेले आढळले. त्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. प्रथम त्यांनी आपली ओळख सांगण्यास टाळाटाळ केली, मात्र अधिक विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर त्यांनी आपली नावे –
- अविनाश सुनिल पवार, वय २९, रा. पंकजनगर, बार्शी
- सुरेश गणपत पवार, वय ३६, रा. गायकवाड प्लॉट, बार्शी – अशी सांगितली.
पोलिसांनी जेव्हा या ठिकाणी येण्याचे कारण विचारले, तेव्हा त्यांनी असमाधानकारक उत्तरे दिली. त्यांच्या हालचालींवरून आणि वर्तनावरून हे दोघे चोरी करण्याच्या उद्देशाने तिथे लपून बसल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी अंकुश कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


0 टिप्पण्या