चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई : भारत जेव्हा पाकिस्तानला कमकुवत करायला निघाला आणि कमकुवत केलंही, त्या-त्या वेळी पाकिस्तानला वाचवण्यासाठी अमेरिकेसारखे देश पुढे आले. तीन वाजता पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशनचा भारतातील डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशनला फोन येतो आणि पाच वाजता युद्धविरामाची घोषणा होते. दुसऱ्याच दिवशी डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटमार्फत पत्रकार परिषद होते. अधिकारी पाकिस्तानात अतिरेक्यांची १०० प्रशिक्षण केंद्र आहेत, असं सांगतात आणि नऊ सेंटर आपण उद्ध्वस्त केली, हेही स्पष्ट करतात, तेव्हा ९१ सेंटर बाकी असताना आपण 'शस्त्रसंधी' कसा काय केला, असा प्रश्न उरतो? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
दैनिक लोकसत्ता मध्ये याविषयी त्यांनी लेख लिहून भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर भूमिका मांडली.
भारतीय लष्कर पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या मन:स्थितीत आहे. मात्र, राजकीय नेते कचखाऊ भूमिका घेत आहेत. का घेतली जाते अशी भूमिका? सत्ताधाऱ्यांची काही वैयक्तिक कमजोरी तर अमेरिकेला माहीत नाही ना? कारण, वर्चस्वाची परिस्थिती असतानाही आणि पाकिस्तान पुरता अडचणीत असतानाही समझोता केला गेला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, 'माझ्या समाजाचा आणि इतर समाजाचा प्रश्न असेल, तेव्हा मी माझ्या समाजाच्या बाजूने राहीन; पण देश आणि माझ्या समाजाचा प्रश्न असेल तर मी देशाच्या बरोबर राहीन.' त्यामुळं सत्तेत असलेल्यांनी सतत लक्षात ठेवावं की, तुमच्यापेक्षा देश मोठा आहे. तिथे एकच भूमिका असली पाहिजे की, मी उद्ध्वस्त झालो तरी चालेल; पण देशाला उद्ध्वस्त होऊ देणार नाही! अशी भूमिका त्यांनी लेखात मांडली.


0 टिप्पण्या