जात प्रमाणपत्रासाठी १२८ रूपये तर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ६९ रूपये मोजावे लागणार; विद्यार्थी,शेतकरी सह सर्वसामान्यांना फटका!
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :-आपले सरकार सेवा केंद्रातील प्रमाणपत्रासाठीची अतिरिक्त दरवाढ थांबवा व सेवा शुल्क पूर्ववत करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना पाठविण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे,
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,राहुल पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
आपले सरकार सेवा केंद्रातून दिल्या जाणा-या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्राचे शुल्क आता दुप्पटीने वाढविण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर साडे सहा वर्षानंतर हे शुल्क अचानक वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी,शेतकरी,सर्वसामान्यांना या शुल्क दरवाढीचा फटका बसत आहे.नंदूरबार हा आदिवासी बहूल जिल्हा आहे.येथील बरीच लोक ही शेती,मजूरीवर आपला उदरनिर्वाह करतात.त्यामुळे हे शुल्क लोकांना परवडणारे नाहीत.
उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पहिले ३३ रूपये द्यावे लागत होते , आता ६९ रूपये दरवाढ झाली आहे.जात प्रमाणपत्र व नाॅन क्रिमीलेअर साठी ५७ रूपये शुल्क होती,आता १२८ रूपये एवढी शुल्क वाढ करण्यात आली आहे.
नंदूरबार जिल्ह्य़ात ३०० पेक्षा अधिक आपले सरकार सेवा केंद्रे आहेत. इयत्ता १२ वीचा निकाल लागल्यामुळे विद्यार्थांची प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांसाठी धावपळ सुरू आहे.
सध्या विद्यार्थांचे दाखले काढले जात आहेत. त्यामुळे सेवा शुल्क अचानक वाढविल्यामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे.तरी आपले सरकार सेवा केंद्रातील प्रमाणपत्रासाठीची शुल्क दरवाढ त्वरित थांबवून पूर्ववत सेवा शुल्क आकारण्यात यावेत.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या