Ticker

6/recent/ticker-posts

सार्वजनिक ठिकाणी केक कापल्याच्या वादातून मारामारी; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :- शेटफळ येथे सार्वजनिक ठिकाणी केक कापल्याच्या किरकोळ वादातून एका कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.), २०२३ च्या विविध कलमांखाली मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुभाष कसबे (वय ३८, रा. शेटफळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ६ जून २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजता शेटफळ येथील स्वामी समर्थ महाराज मंदिरासमोर सुमित अरविंद थोरात याचा वाढदिवस साजरा करत असताना सार्वजनिक ठिकाणी केक का कापत आहात, असे विचारले. यावरून सुमित अरविंद थोरात याने शिवीगाळ आणि दमदाटी केली होती.

दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ७ जून २०२५ रोजी सकाळी १०:३८ वाजता सुमित अरविंद थोरात याने मारुती कसबे यांचा चुलत भाऊ रमेश दिलीप कसबे याला फोन करून आयटीआय कॉलेजजवळ बोलावले. मात्र, रमेश कामावर निघून गेला. त्यानंतर सायंकाळी ७:०० वाजता रमेश काम संपवून स्वामी समर्थ महाराज मंदिरासमोरून घरी जात असताना, तिथेच उभ्या असलेल्या सुमित थोरातने त्याला अडवून, "तुम्ही काल आमचं काय वाकडं केलं?" असे विचारत मोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी आरडाओरडा ऐकून मारुती कसबे यांचे वडील सुभाष केरबा कसबे, रुपाली रमेश कसबे आणि स्वाती दीपक कसबे हे भांडण सोडवण्यासाठी तिथे आले. त्यावेळी सुमित थोरातने बाजूला पडलेली काठी घेऊन सुभाष कसबे यांच्या पाठीवर मारहाण केली. त्याचवेळी सुमितचे मित्र सुधीर उर्फ दाद्या सुखदेव रावडे, रितेश सुधीर रावडे, वीर सचिन रावडे आणि अरविंद सिद्धेश्वर थोरात हे देखील तिथे आले आणि त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.

शेजारी राहणारे हनुमंत आगतराव कसबे आणि भारत कसबे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. त्यानंतर सुमित आणि त्याचे मित्र तिथून निघून गेले. जखमींना वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी रुग्णालयात पाठवले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सुमित अरविंद थोरात, सुधीर उर्फ दाद्या सुखदेव रावडे, रितेश सुधीर रावडे, वीर सचिन रावडे आणि अरविंद सिद्धेश्वर थोरात (सर्व रा. शेटफळ, ता. मोहोळ) यांच्याविरोधात बी.एन.एस. कलम ११८(१), १८९(२), १९०, १९१(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार चंद्रकांत तुकाराम आदलिंगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या