चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-दरवर्षी पावसाळ्याच्या हंगामात वीज पडून विदर्भातील विशेषतः भंडारा, गोंदिया, वर्धा इत्यादी जिल्ह्यांमध्ये शेत-शिवारात काम करणारे शेतकरी, मजूर तसेच इतर ठिकाणी असलेले अनेक लोक व जनावरे मृत्युमुखी पडतात. भारतात दरवर्षी सुमारे २५०० लोक वीज पडून मरण पावतात. जमिनीवर कोसळणाऱ्या वीजेचा दाब लाखो व्होल्ट्सचा असतो. आकाशातून झपाट्याने खाली येणारी वीज उंच वस्तूंवर, झाडांवर, इमारतींवर, माणसांवर, विद्युत खांबांवर आदळते आणि तिच्या झटक्याने संपर्कात आलेली प्रत्येक वस्तू नष्ट होते.
वीज नेमकी कधी आणि कुठे कोसळेल हे आजवर निश्चित सांगता आलेले नाही. त्यामुळे आपली स्वतःची काळजी घेणे आणि योग्य ती खबरदारी घेणे हेच आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. पावसात जर आपल्या मानेमागील केस उभे राहिले, तर समजावे की वीज कोसळणार आहे. अशा वेळी शेतात राहणे, झाडाखाली थांबणे, उंच खांबांच्या खाली थांबणे, चप्पल/बूट न घालता खुले मैदानात जाणे, मोबाइलवर बोलणे, टीव्ही सुरू ठेवणे हे टाळावे. तलाव, सरोवर, जलस्रोत यामधून त्वरित बाहेर यावे आणि पूर्ण खबरदारीने वागून आपले अमूल्य जीवन वाचवावे.असे ग्रिन हेरिटेज तर्फे आह्वान करण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुद्धा वेळोवेळी सूचनांच्या माध्यमातून नागरिकांना सावध केले जाते. राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस, गारपीट, वीज कोसळण्याच्या घटना घडून अनेक लोक व जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्र व भारतातील बहुतेक भागांमध्ये सध्या मान्सून सक्रीय झाला आहे व लवकरच भंडारा-गोंदिया जिल्ह्यांमध्येही मान्सूनची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यातील घनदाट जंगलपट्टा असलेले – तुमसरपासून मोहाडी, भंडारा पर्यंत – यामुळे पावसाळ्यात वीज प्रचंड गडगडाटासह तीव्रतेने कोसळते.
वीज कोसळण्यापासून बचावासाठी शेतात व इतर ठिकाणी उपाययोजना व्हाव्यात म्हणून सन २०१६ मध्ये ग्रीन हेरिटेजकडून माजी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन (नवी दिल्ली) यांना पत्र पाठवले गेले होते, ज्याची दखल घेतली गेली होती. राज्य प्रशासनाकडे शक्तिशाली लाइटनिंग अरेस्टर बसविण्याबाबत मागणी करत ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशन, भंडारा यांच्याकडून जिल्हाधिकारीमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, कृषिमंत्री म.रा. मुंबई यांना पत्र पाठवले गेले होते.
या पत्राच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. अभिषेक नामधस यांनीही मंत्रालय मुंबई येथील प्रधान सचिवांना पत्र पाठवले होते. मात्र निधीच्या अभावामुळे अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. अलीकडेच राज्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री मा. श्री. आशीष जायसवाल यांना देखील ग्रीन हेरिटेजतर्फे पत्र पाठवले गेले आहे.
0 टिप्पण्या