जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन;२ वर्षापासून पुलाचे काम रखडले;वाहनचालक व प्रवाशी त्रस्त
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार :- शहादा ते प्रकाशा मार्गावरील डामरखेडा येथील पुलाचे काम गेल्या २ वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे.संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,बिलीचापडा गाव अध्यक्ष वनसिंग पटले,भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,तालुकाध्यक्ष अजय वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
शहादा ते प्रकाशा या मुख्य मार्गावरील डामरखेडा येथील पुलाचे काम गेल्या २ वर्षांपासून संबंधित ठेकेदार संथगतीने करीत आहे.या मार्गावरील डामरखेडा येथील पूल धोकादायक असल्याकारणास्तव शहादा हून प्रकाशा काथर्दा या पर्यायी मार्गाने गेल्या २ वर्षांपासून जड वाहने व एस टी महामंडळ च्या बसेस जात आहेत. या पर्यायी मार्गाने प्रवाशांना टिकीट भाडे अधिक लागत असून वेळही अधिक जात आहे.
अवकाळी पावसामुळे शहादा ते प्रकाशा या काथर्दा या पर्यायी मार्गावरील गोमाई नदीवरील पूल सुद्धा तुटला आहे.त्यामुळे एस टी बस शहादा हून म्हसावद मार्गाने प्रकाशा अशा पर्यायी मार्गाने जात आहे.या मार्गावरील अंतर वाढल्यामुळे प्रवाशांना भाडेही अधिक द्यावे लागत आहे. शहादा ते नंदूरबार जाण्यासाठी म्हसावद मार्गाने १०५ रूपये टिकीट दर वाढविण्यात आले आहे. पूल तुटल्याचा गैरफायदा घेऊन खाजगी टॅक्सीवाले सुद्धा शहादा ते नंदूरबार साठी डामरखेडा मार्गाने प्रवाशांकडून तब्बल १०० रूपये उकडत आहेत.
वरील सर्व त्रासांना सर्वस्वी जबाबदार डामरखेडा येथील पुलाचे संथ गतीने काम करणारा ठेकेदार आहे.म्हणून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.पुलाच्या कामाचा ठेका अन्य ठेकेदारास देऊन पुलाचे काम तातडीने करून घेण्यात यावे व वाहनधारक व प्रवाशांना अधिक आर्थिक भुर्दंड, अधिक वेळ खर्च ,धोकादायक प्रवास अशा त्रासापासून मुक्त करण्यात यावे.यासाठी डामरखेडा येथील पुलाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे,यासाठी संबंधित बांधकाम विभागास निर्देश देण्यात यावे.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या