Ticker

6/recent/ticker-posts

बार्शीतील हॉस्टेलमधून अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-बार्शी शहरातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणारी बारावीतील एक अल्पवयीन विद्यार्थिनी 31 मे 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता ‘गावाला जाते’ असे सांगून हॉस्टेलमधून बाहेर पडली आणि त्यानंतर अद्याप परतली नाही. याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराने 3 जून रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपात तक्रार दिली. तक्रारीनुसार, संबंधित विद्यार्थीनी बार्शीतील एका नामांकित महाविद्यालयात बारावीमध्ये शिक्षण घेत होती. तिच्या सुरक्षित वास्तव्याकरिता तिला दिनांक 28 मे रोजी हॉस्टेलमध्ये ठेवण्यात आले होते. 2 जून रोजी हॉस्टेलच्या मालकाकडून पालकांना माहिती मिळाली की विद्यार्थिनी गेल्या दोन दिवसांपासून हॉस्टेलमध्ये परतलेली नाही.

विद्यार्थिनीच्या मैत्रिणींनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मे रोजी ती दुपारी ‘गावाला जाते’ असे सांगून गेली होती. त्यानंतर तिचा कुठलाही संपर्क झालेला नाही. पालकांनी तिच्या नातेवाइकांकडे, आजूबाजूच्या परिसरात आणि मूळ गावी शोध घेतला; मात्र ती कुठेही सापडली नाही. त्यामुळे पालकांनी संशय व्यक्त केला की, अज्ञात इसमाने काही अमिष दाखवून तिला फुस लावली असावी.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची प्राथमिक चौकशी सुरू असून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, मैत्रिणींचे जबाब आदींच्या आधारे तपास सुरू आहे.

या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता वाढली असून मुलींच्या हॉस्टेलमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी जनतेस आवाहन केले आहे की, कोणालाही या विद्यार्थिनीबाबत माहिती असल्यास बार्शी शहर पोलीस ठाण्याशी तत्काळ संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या