Ticker

6/recent/ticker-posts

नवप्रविष्ठ पोलीसांची सर्वसामान्यांशी वर्तणूक न्यायपूर्ण असावीपोलीस प्रशिक्षणार्थीं दीक्षांत संचलन सोहळयातविशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळेंचे प्रतिपादन


आजचा दिवस दैदीप्यमान, गौरवास्पद आणि अविस्मरणीय क्षण

  चित्रा न्युज प्रतिनिधी 
 धुळे : नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थीं आजपासून पोलीस दलात एक कर्तव्यदक्ष, निर्भय आणि धैर्यशील पोलीस म्हणून समाविष्ठ होत आहे. तुम्ही समाजाचे खरे पहारेकरी असल्याने कोणत्याही प्रकारचे पक्षपाती वर्तन न करता आपली सर्वस्तरातील नागरिकांशी वागणूक न्यायपूर्ण आणि सहकार्याची असावी. असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आज नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थींच्या 12 व्या दीक्षांत संचलन सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केले.

  पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे येथे सत्र क्रमांक 12 मधील 645 नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ येथील कवायत मैदानावर संपन्न झाला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार, राज्य राखीव पोलीस बल गटाचे समादेशक प्रभाकर शिंदे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपप्राचार्य राहुल फुला आदी उपस्थित होते.

  विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. कराळे म्हणाले की, आजच्या 645 नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थीचा दीक्षांत समारंभाच्या संचलनामध्ये सहभागी सर्व तेजस्वी, प्रामाणिक आणि निष्ठावान पोलिस प्रशिक्षणार्थींसाठी आजचा दिवस हा एक दैदीप्यमान गौरवास्पद आणि अविस्मरणीय क्षण आहे. हा केवळ एका प्रशिक्षणाचा समाप्ती बिंदू नाही, तर एका उज्ज्वल आणि स्फूर्तीदायक प्रवासाची सुरुवात आहे. तुम्ही कठोर परिश्रम, अपार मेहनत आणि अद्वितीय शिस्तीच्या बळावर येथे उभे आहात. प्रशिक्षणादरम्यान आपणास चांगल्या प्रकारचे आंतरवर्ग व बाहयवर्गाचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. प्रशिक्षण केंद्रामधील सर्व सोयी-सुविधांचा वापर करुन अत्यंत चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण घेऊन आज आपण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्य करण्यासाठी सज्ज झाला असून कायम विद्यार्थी म्हणून चौकस रहा. पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणारी यंत्रणाच नाही, तर समाजाच्या सुरक्षेचे व अभेद्यतेचे सशक्त आधारस्तंभ आहे. तुमच्यासाठी पोलीस वर्दी हा केवळ पोशाख नाही, तर ती जबाबदारी, निष्ठा आणि बलिदानाचे धगधगते प्रतीक असल्याचेही ते म्हणाले. 

  श्री. कराळे पुढे म्हणाले की, तुमचे कार्य केवळ गुन्हेगारीला आळा घालणे नाही, तर समाजात सुव्यवस्था प्रस्थापित करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेची भक्कम ताकद बनणे हे आहे. संकटाच्या काळात तुम्ही जनतेच्या आशेचा प्रकाश, त्यांच्या विश्वासाचा कणखर आधार बनले पाहिजेत. आपल्या कार्यक्षेत्रातील विविध समुदायातील प्रभावशाली व सर्वसामान्य नागरीक, व्यापारी संघटना, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी आपला नियमित संपर्क असणे आवश्यक आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांची माहिती सुध्दा आपल्याला याच व्यक्तींकडून मिळत असते. एखाद्या वेळी तणावाचे प्रसंग निर्माण झाल्यास तणाव निवळण्यासाठी सुध्दा अशा व्यक्तींची आपणास मदत होत असते. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अशा व्यक्तींशी आपला सतत संपर्क असणे आवश्यक आहे. पोलीस दलाकरीता सतत संपर्कांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचेही ती म्हणाले. 

  अलीकडच्या काळात विशेषतः गेल्या 10 ते 12 वर्षात विविध प्रसार माध्यमे, सोशल मिडिया यांच्या व्यापक प्रसारामुळे प्रचंड सामाजिक जागृती झाली आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहेच. कोणत्या घटनेचे पडसाद कोठे व कसे उमटतील हे सांगता येत नाही. समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनावरील प्रतिक्रिया त्वरीत सोशल मिडियावर प्रकट होतात. त्यामधून प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न सुध्दा निर्माण होतात. त्यामुळे पोलीस दलाला सदैव सतर्क राहावे लागते. एक पोलीस म्हणून सदैव सतर्क व चौकस राहावे. आपल्या शहरात, जिल्हयात, राज्यात व देशात घडणाऱ्या महत्त्वाच्या व संवेदनशील घटनांचा आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत काय परिणाम होऊ शकतो? याचा विचार करण्याची सवय आपल्या मनाला लावण्याची आवश्यकता असून असा अभ्यास प्रत्येक महत्त्वाच्या व गंभीर घटनांबाबत केल्यास आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक कायदा व सुव्यवस्थेचे प्रसंग टळू शकतात.

  देशाच्या सुरक्षिततेसाठी, कायद्याच्या रक्षणासाठी आणि न्यायाच्या प्रस्थापनेसाठी अखंड निष्ठेने कार्य करण्याची तुम्ही शपथ घेतली आहे. नागरिकांच्या रक्षणाची, कायद्याच्या पालनाची आणि सामाजिक न्यायाची तुम्ही शपथ घेतली. या शपथेस कटिबद्ध राहा, कारण हीच तुमची खरी ओळख आहे. तुमचा प्रत्येक निर्णय हा प्रामाणिकपणाने, निःस्वार्थ भावनेने आणि समाजहिताच्या व्यापक दृष्टिकोनाचा असावा. संकटाला सामोरे जाण्यासाठी तुम्ही सदैव सज्ज राहा, अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी नेहमी तत्पर राहा आणि कर्तव्यपूर्तीसाठी सदैव निष्ठावान राहा, असेही त्यांनी सांगितले.

  पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री. पवार म्हणाले की, धुळे प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र पोलीस दलात नव्याने भरती झालेले पोलीस अंमलदार, होमगार्ड व महाराष्ट्र सुरक्षा बल यांना मुलभूत प्रशिक्षण व पोलीस अधिकारी/अंमलदार यांना सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाते. आजपावेतो नवप्रविष्ठ पोलीस शिपाई यांचे 12 प्रशिक्षण सत्र पूर्ण होत असून त्यात 4 हजार 385 नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी व 3 सत्रांमध्ये 1 हजार 35 होमगार्ड यांनी मुलभुत प्रशिक्षण घेतलेले आहे. 882 कवायत निदेशक कोर्स, इंडक्शन कोर्स अंतर्गत 1 हजार 821 पोलीस उपनिरीक्षक तर प्रोफेशन स्किल अपग्रेडेशन अंतर्गत 2 हजार 35 प्रशिक्षणार्थीना सेवांतर्गत प्रशिक्षण असे आजपावेतो एकूण 10 हजार 158 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

  12 व्या सत्रात भारतीय न्याय संहिता-2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहीता-2023 व भारतीय साक्ष अधिनियम-2023 यांचे मुलभुत प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थीमध्ये शिस्त रुजविण्यासाठी पद व शस्त्र कवायत शिकविले असून कायदा व सुव्यवस्था, दहशतवाद व घातपात इत्यादीसारखे महत्वाचे प्रसंग हाताळणे, तसेच गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी प्रशिक्षणार्थींना लाठी व शस्त्र हाताळणी, गोळीबार, कराटे, जमाव नियंत्रण आणि कमांडो यांचेही प्रशिक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी योगाभ्यास देखील शिकविण्यात आला आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती जोपासली जावी. याकरीता आमच्या ग्रंथालयात आम्ही कायदा व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांसह विविध अशा कथा कांदबऱ्या, असे सर्व मिळून 5 हजार 834 पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र पोलीसांचे ब्रिद वाक्य" सद्रक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजे सज्जनांचे संरक्षण व दुर्जनांचे दमन म्हणजेच " To Protect the Good and to Punish the Evil " या उक्तीनुसार कार्य करण्यासाठी आज आमचे प्रशिक्षणार्थी सज्ज झाले आहेत.

  सर्वसामान्य कुटुंबातून आलेले सर्व प्रशिक्षणार्थी आज एका शिस्तबध्द पोलीस खात्यात जनतेला सेवा देण्यासाठी सर्वार्थाने तयार झाले आहेत, हे त्यांनी आजच्या अतिशय शिस्तबध्द अशा दीक्षांत संचलनातून दाखवून दिले आहे. मी जनतेला आश्वस्त करू इच्छितो की, आमचे प्रशिक्षणार्थी हे शिस्तीचे अनुकरण करुन धैर्य, विवेक, सामर्थ्य, सचोटी व प्रामाणिकपणाने आपले कर्तव्य पार पाडून या संस्थेसह संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाची किर्ती व नावलौकीक वाढवतील असेही श्री. पवार शेवटी म्हणाले.

यांचा झाला सत्कार

  यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.कराळे यांच्या हस्ते पोलीस प्रशिक्षण सत्र 12 चे विजेत्या प्रशिक्षणार्थ्यींचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. यात बेस्ट टर्न आऊट ऋषिकेश मठकर (सिंधुदुर्ग), आंतरवर्ग प्रथम सुर्यभान पाटील (जळगांव), बाह्यवर्ग प्रथम दिग्विजय दाभाडे (जळगांव), गोळीबार प्रथम शरद कोंड (नाशिक ग्रामीण), कमांडो प्रथम दिग्विजय दाभाडे (जळगांव), बेस्ट ड्रील (पद व शस्त्र) जितेंद्र मोरे (मिरा  भाईदर), सर्वोत्कृष्ट खेळाडू अमर क्षिरसागर (सोलापूर ग्रामीण) तर सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सुर्यभान पाटील (जळगांव) या सर्वांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

  प्रांरभी प्रमुख अतिथींना मानवंदना, परेड निरीक्षण, ध्वज टोळीचे आगमन, प्रशिक्षणार्थींना शपथ, दीक्षांत संचलन परेड करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कल्याणी कच्छवा तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य राहुल फुला यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, प्रशिक्षणार्थ्यांचे पालक, नातेवाईक उपस्थित होते.
000000

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या