Ticker

खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांचा रोखठोक सवाल!


 निधी नाही, नियोजन फोल; महिला रुग्णालय, मेडिकल कॉलेज, कर्जमाफी, बोनस, नागनदीचे दूषित पाणी, शहर वाशीयांना मिळतो दूषित पाणी तसेच आदिवासी सांस्कृतिक भवनावर जोरदार सवाल
      
चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:- भंडारा जिल्हा नियोजन समितीची बैठक आज रविवार दि.8 जून 2025 रोजी भंडारा जिल्हा पालकमंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र, ही बैठक दोन तासांत गुंडाळण्यात आल्यावरच खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी थेट सरकारला सवालांचा खडा टाकला. जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन फाईलपुरते मर्यादित राहिले असून, निधी मिळालाच नाही, मग ही बैठक म्हणजे केवळ औपचारिकता का, असा थेट प्रश्न उपस्थित करत त्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली. ही एखाद्या पक्षाची बैठक नाहीच. ही जनतेच्या हिताची बैठक आहे. क्षेत्राचा विकास झाला पाहिजे हा माझा मानस आहे. त्यासाठी झटणार, आणि भांडणार पण असेही खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी सांगितले.

   भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी असलेल्या डॉ.प्रश्नांत पडोळे यांनी जनसामान्यांशी निगडित विषयावर ठाम भूमिका घेत, बैठक गुंडाळण्याच्या घाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  दिवसभर चालावयाची बैठक दोन तासांत उरकणे, म्हणजे विकासाच्या प्रक्रियेची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे असा संतप्त सूर त्यांनी मांडला. उत्तर महाराष्ट्रातून पालकमंत्र्यांची नेमणूक झाल्याने वेळेची मर्यादा असते. 471 किलोमीटरचे अंतर पार करून ते भंडारा जिल्ह्यात दाखल होतात, हे खरे आहे. पण त्यामुळे भंडाऱ्याच्या योजनांची इतकी उपेक्षा होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

     बैठकीत भंडारा जिल्ह्याच्या आर्थिक वर्ष 2025-26 साठी मंजूर झालेली तरतूद BDS प्रणालीवर अद्याप प्राप्तच नसल्याची गंभीर बाब समोर आली. अनुसूचित जाती व सर्वसाधारण योजना या दोन्हीच्या निधीपैकी एक पैसाही जिल्ह्याला मिळालेला नाही, हे समजल्यावर डॉ.पडोळे आक्रमक झाले. केवळ OTSP अंतर्गत 11.40 कोटीपैकी 3.41 कोटी रु. आले, त्यातही केवळ 8.26 लाख रु. खर्च झाले, म्हणजे प्रत्यक्ष खर्च फक्त 0.72% हा खर्च जाहीर करून नियोजन समितीचे काम पूर्ण झाले असे मानणे ही जिल्ह्याच्या जनतेशी गद्दारी आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

  महिला रुग्णालयाचा मुद्दा मांडताना त्यांच्या आवाजातील वेदना स्पष्ट जाणवत होत्या. सन 1999 साली जिल्हा विभाजन झाले, 2013 ला इमारतीला मंजुरी, पण 2023 उजाडेपर्यंत रुग्णालयच उभे राहिले नाही. आणि आजही डॉक्टर व कर्मचाऱ्यांची मंजुरी दिलेली नाही? महिलांना रुग्णसेवा मिळावी ही मागणी नाही तर हक्क आहे, असे त्यांनी ठासून सांगितले. यासोबतच भंडारा जिल्हा मेडिकल कॉलेजच्या दैनावस्थेवरही त्यांनी जळजळीत भाष्य केले – अनाटॉमी डिक्टेशनशिवाय विद्यार्थ्यांचे पेपर झाले, प्रॅक्टिकल सुविधा नाहीत, शव नाहीत, प्राध्यापक नाहीत. सरकार व प्रशासनाने शिक्षणाची थट्टा चालवली आहे असा आरोप त्यांनी केला ?

  खासदार डॉ.पडोळे यांनी आदिवासी समाजासाठी स्वतंत्र सांस्कृतिक भवनासह संग्रहालय, व ओबीसी-आदिवासी समाजासाठी प्रत्येकी 500 क्षमतेच्या वस्तीगृहांचीही जोरदार मागणी केली. गडचिरोली, नंदुरबारला आदिवासी भवन असू शकते, तर भंडाऱ्यात का नाही? मी स्वतः खासदार निधीतून काही रक्कम देण्यास तयार आहे, पण शासनाने पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या ओबीसी व आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची कमतरता आहे. राहण्याच्या अभावामुळे अनेकांचे शिक्षण अपूर्ण राहते, ही शोकांतिका तात्काळ थांबवावी, अशी कळकळीची मागणी त्यांनी मांडली.

वैनगंगा नदीमध्ये नाग नदीच्या प्रदूषणाच्या मुद्दा, भंडारा शहरातील संभाव्य पूर्व परिस्थिती, भूमिगत गटार व पाणीपुरवठा योजनांमुळे झालेली रस्त्यांची दुर्दशा, पुनर्वसनातील 34 गावांचा प्रश्न, पट्टे, अवैध रेती, मुरूम उत्खनन, विना नंबर प्लेट गाड्या, एकाच नंबरचे गाड्या याकडे दुर्लक्ष असलेला Rto विभाग गेला तरी कुठे? भंडारा जिल्ह्यामध्ये उद्योग न येण्याची कारणे, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा कितीतरी मुद्द्यांना खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी वाचा फोडली.

मी स्वतःसाठी नाही लोकांसाठी भांडलो - खासदार डॉ. पडोळे
रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आक्रमकतेबद्दल बोलताना डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी म्हटले की मी स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी भांडलो आहे. लोकांची कामे झाली पाहिजेत. विरोधी पक्ष म्हणून लोकांच्या समस्या त्यांच्या भावना व्यक्त करणे हा आमच्या अधिकार आणि कर्तव्य आहे. तेच मी पार पाडत आहे. विरोधी पक्ष लोकशाहीचा कणा आहे, निधीच्या वाटपात दुजाभाव होऊ नये. जनतेच्या हितासाठी खासदार म्हणून मांडलेल्या मागण्या राजकारणाच्या पटापलीकडच्या आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी भंडाऱ्याच्या विकासाच्या दृष्टीने ठोस निर्णय घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांना केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या