चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई :-मधील सायन काला किल्ला जवळील जोगळेकरवाडी म्युनिसिपल शाळा संकुलमधील सुप्रसिध्द ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पुर्व) येथे गुरुवार दि. १० जुलै २०२५ रोजी गुरुजनांचा सन्मानाची गुरु पौर्णिमा अत्यंत उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली.
ह्यावेळी सर्व इयत्तामधील विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन कार्यक्रमाचे नियोजन केले आणि शिक्षकांना या कार्यक्रमात मान्यवर म्हणून सहभागी केले. ज्यातून गुरु-शिष्य परंपरेचा एक सुंदर आदर्श पुन्हा एकदा अनुभवता आला.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रात्रशाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुजनांच्या महतीवर आधारित कविता वाचन केले, तर काहींनी स्फूर्तिदायक भाषणे दिली, ज्यातून गुरुजनांच्या त्यागाचे आणि निःस्वार्थ सेवेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांना फुले आणि भेटवस्तू देऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना आशिर्वाद दिले आणि त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रमुख मान्यवरांमध्ये ज्ञानविकास नाईट हायस्कुलचे सर्व विद्यार्थ्यांचे लाडके आणि आदरणीय मुख्याध्यापक श्री. भिमराव मुरलीधर परदेशी सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत गुरु पौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "गुरु हे आपल्या जीवनातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण योग्य मार्गावर चालतो आणि जीवनात यश प्राप्त करून आदर्शवान बनतो."
शेवटी कार्यक्रमाचा समारोप श्री. विनोद पोकळे सर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थिताचे आभार मानले आणि मिष्ठानाचा अल्पोपहार वाटप करण्यात आला.
हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नव्हता, तर तो गुरु-शिष्य संबंधांना अधिक दृढ करणारा आणि भावी पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारा एक महत्त्वाचा प्रसंग होता.


0 टिप्पण्या