Ticker

6/recent/ticker-posts

वरोरा शहरातील ‘यात्रा वार्ड’ हादरले! दुकानाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला



सविता एकरे यांच्या मालकीच्या दुकानाचे आर्थिक नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही, कारणाचा शोध सुरू


चित्रा न्युज प्रतिनिधी 
वरोरा: शहरातील प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत येणाऱ्या ‘यात्रा वार्ड’ परिसरात आज एका दुकानाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

प्राप्त माहितीनुसार, सदर दुकान हे सविता एकरे,रा.नंदोरी यांच्या मालकीचे आहे. आज अचानक दुकानातून धूर निघत असल्याचे पाहून परिसरात खळबळ उडाली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले.

घटनेची माहिती मिळताच वरोरा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अत्यंत कौशल्याने आणि जिद्दीने कामगिरी करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. 

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आजूबाजूच्या दुकानांना किंवा घरांना लागण्यापासून वाचली. यात्रा वार्ड परिसरात दुकाने व घरे दाटीवाटीने असल्याने वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. वरोरा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या या तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-----------------------------------------------
वरोरा शहरातील यात्रा वार्ड हादरले! सविता एकरे यांच्या दुकानाला अचानक भीषण आग. धूर बघून परिसरात खळबळ. पण वरोरा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तत्पर धाव घेऊन काही वेळातच आग आटोक्यात आणली. मोठा अनर्थ टळला. आर्थिक नुकसान झाले पण जीवितहानी नाही. आगीचे कारण अद्याप समजले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या