धर्मापेक्षा संविधान मोठे- सुशिलकुमार पावरा
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या इयत्ता पहिलीत दाखल नोंदीत व शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू शब्दाचा उल्लेख करू नये,फक्त जमातीचा उल्लेख करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे दिनांक ८ जुलै २०२५ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.त्या निवेदनाची दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी शहादा यांनी सर्व मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा शहादा तालुका यांना दिनांक २१ जुलै २०२५ रोजी एक आदेश काढला आहे.या आदेशात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासन निर्णय १२ जानेवारी २००० नुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थांच्या शाळेच्या दाखल्याच्या नोंदीत व शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू शब्दाचा उल्लेख करू नये,फक्त मूळ जातीचा स्पष्ट उल्लेख करावा.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या नोंदीत काही शाळेचे मुख्याध्यापक हे आपल्या मनाने आदिवासी पालकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हिंदू शब्दाचा उल्लेख करत होते.त्यावर बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून आक्षेप नोंदवत एक तक्रार दाखल करण्यात आली होती.तक्रारीनंतर संबंधित मुख्याध्यापक यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या नोंदीत हिंदू शब्द न लिहिता फक्त जमातीची उल्लेख करायला सुरुवात केली.
आदिवासी पालकांना आम्ही जाहीर आवाहन करितो की,आपल्या मुलांच्या शाळेतील नोंदीत धर्माचा उल्लेख करू नये,फक्त जमातीचा उल्लेख करावा.जर कोणी मुख्याध्यापक ऐकत नसेल ,त्याच्या मनाने धर्माची नोंद करत असेल तर बिरसा फायटर्स कडे संपर्क साधावा.गटशिक्षणाधिकारी शहादा यांचे आम्ही आभार मानतो.भारत देशाचा कारभार हा संविधानाने चालतो,धर्माने नाही.धर्मापेक्षा संविधान मोठे आहे.ही लेखणीची संविधानिक जीत आहे.अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या