चार अल्पवयीन मुले पोलीसांच्या जाळ्यात!
✍️ भवन लिल्हारे उपसंपाद महाराष्ट्र राज्य मो.नं. 9373472847
नागपूर : शआजूबाजूच्या मुलांना चमचमीत पदार्थ खाताना पाहून गरीब घरातील अल्पवयीन मुलांना काय चांगले, काय वाईट कळालेच नाही व पैसे मिळविण्यासाठी त्यांनी चक्क सायकलचोरांची टोळीच तयार केली. आश्चर्याची बाब म्हणजे टोळीतील सर्वात मोठा सदस्य १२ वर्षाचा, तर सर्वात लहान सदस्य सात वर्षांचा. ज्याचे दुधाचे दातदेखील पडले नाहीत तो चमचमीत पदार्थ व पानठेल्यांवरील पाकिटाच्या मोहात सायकली चोरू लागला. पोलिसांनी चार मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांची ही चित्तरकथा ऐकून कर्मचारीदेखील अचंबित झाले.
बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. मनीषनगर, बेलतरोडी येथील रहिवासी फिर्यादी आशिष उमाटे (वय ४०) यांच्या मुलीची सायकल चोरी झाली. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली व पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी एका सात वर्षाच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला. त्या मुलासोबत इतर आणखी तीन ते चार साथीदार एकाच शाळेत शिकतात. सर्व मुले गरीब घरांतील असून, कुणाला आईवडील नाही, तर कुणी नातेवाइकांकडे राहून शिक्षण घेत आहे.
मुलांना अभ्यासात रस नसल्याने ते अनेकदा सोबत शाळेला दांडी मारतात. फिरत असताना ते अनेकदा विविध हॉटेल्सशेजारी गेले की तेथील खाद्यपदार्थ पाहून यांचीदेखील इच्छा होत होती. पैसे नसल्याने त्यांनी सायकली चोरायला सुरुवात केली. पहिली सायकल त्यांनी तीनशे रुपयांना विकली व त्यातून एका हॉटेलमध्ये जाऊन भरपेट नाश्ता केला.
चमचमीत खाण्यासाठी अन् सायकली विकण्यासाठी फंडेचोरलेल्या सायकली कवडीमोल भावात विकण्याची मुलांची तयारी असायची. कधी आईची प्रकृती खराब आहे असे कारण, तर कधी आजोबा-भाऊ दवाखान्यात दाखल झाला आहे अशी थाप ते मारायचे. एकदा तर अभ्यासाची पुस्तके घेण्यासाठी पैसे नसल्याची बतावणी करत त्यांनी पाचशे रुपयांना सायकल दिली. एका मुलाला पानठेल्यावरील पुड्यांची आवड निर्माण झाली व त्यासाठी तो यात सहभागी झाला होता.
0 टिप्पण्या