रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने कृषीमंत्र्यांचा अनोखा सन्मान; विधानसभेतील पत्त्यांचा पराक्रम आणि ‘भिकारी’ वक्तव्य ठरले कारण*
चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे: महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे रम्मी खेळातील अप्रतिम कौशल्य आणि त्यांच्या धाडसी वक्तव्यांसाठी रुग्ण हक्क परिषदेतर्फे *‘रम्मीरत्न पुरस्कार - २०२५’* जाहीर झाला आहे. परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, यामुळे कोकाटे यांच्या ‘पत्त्यांच्या बादशहा’ या उपाधीला आणखी बळ मिळाले आहे.
*पुरस्काराचे स्वरूप आणि सन्मान*
हा पुरस्कार पत्त्यांचा कॅट, पत्त्यांच्या डिझाईनने सजलेली शाल, मानपत्र आणि पत्त्यातील गुलाम चित्राचे खास गौरवचिन्ह अशा भव्य स्वरूपात प्रदान केला जाणार आहे. परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सांगितले की, “माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत पत्ते खेळण्याचा पराक्रम दाखवला आणि महाराष्ट्र सरकारला ‘भिकारी’ संबोधून आर्थिक परिस्थितीची जाहीर कबुली दिली. या दोन्ही बाबींमुळे त्यांनी समाजमनावर सरकारच्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या अनोख्या योगदानासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.”
माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत पत्त्यांचा खेळ खेळताना दाखवलेली चपळाई आणि माध्यमातून बोलताना केलेली रणनीती यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी रम्मी खेळातील जाहिरातीचा वापर इतक्या खुबीने केला की, सहकारी आमदारही थक्क झाले. “पत्ते खेळणे ही कला आहे, आणि कोकाटे साहेब त्या कलेचे बादशहा आहेत,” अशीच चर्चा आहे. याशिवाय, त्यांनी महाराष्ट्र सरकारला ‘भिकारी’ संबोधून केलेल्या सत्य वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. या दोन्ही गोष्टींमुळे त्यांचे नाव ‘रम्मीरत्न’साठी निवडले गेले.
*पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता**
रुग्ण हक्क परिषदेच्या या अनोख्या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “हा पुरस्कार म्हणजे केवळ कोकाटे यांच्या रम्मी खेळातील कौशल्याचा सन्मान नाही, तर त्यांच्या बिनधास्त आणि स्पष्टवक्ते स्वभावाचाही गौरव आहे,” असे उमेश चव्हाण यांनी नमूद केले. हा सोहळा सोमवार, दि. 28 जुलै 2025 रोजी दुपारी 03.00 वाजता पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केला असून, यावेळी पत्त्यांचा एक प्रदर्शनीय सामनाही खेळवला जाणार आहे.
या पुरस्कारामुळे माणिकराव कोकाटे यांच्या कुप्रसिद्धीत आणखी भर पडली आहे. “पत्ते खेळायचे आणि सत्य बोलायचे, हे दोन्ही धाडस कोकाटे साहेबांकडेच शिकावे,” अशी प्रतिक्रिया राज्यातील जनता देत आहे. आता हा सोहळा कसा रंगतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत!
*अधिक माहितीसाठी -*
8806066061
0 टिप्पण्या