Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड सेवानिवृत्त; डॉ. अशोककुमार देवंगरे नवे सहयोगी अधिष्ठाता

पशुवैद्यक महाविद्यालय, उदगीर येथे गौरव व स्वागत सोहळा उत्साहात पार पडला. 

गायकवाड सरांचे महाविद्यालयाच्या जडणघडणीत अमूल्य योगदान – प्रा. डॉ. देवंगरे यांचे गौरवोद्गार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि प्रशासकीय क्षेत्रात ३३ वर्षांच्या समर्पित सेवेच्या नंतर उदगीर येथील प्रा. डॉ. नंदकुमार गायकवाड, शासकीय पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, हे ३१ जुलै २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात त्यांचा सेवापुर्ती सन्मान व नव्या सहयोगी अधिष्ठात्यांचा स्वागत समारंभ एकत्रितपणे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. देवंगरे होते. मंचावर सौ. भाग्यश्री गायकवाड, कु. निकिता गायकवाड, डॉ. अशोककुमार देवंगरे आणि अन्य प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात डॉ. देवंगरे म्हणाले की,
“गायकवाड सरांचे नेतृत्व, प्रामाणिक कार्यशैली, आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली जिव्हाळ्याची भावना हे सर्वांचे प्रेरणास्थान ठरले आहे.”
डॉ. गायकवाड यांनी एनएसएस, परीक्षा कक्ष, विभागप्रमुख, जिमखाना, परीक्षा व्यवस्थापन यासह अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. त्यांनी ६० संशोधन लेख, १५ प्रकल्प पूर्ण केले. अनेक पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यकाळात आर्ट ऑफ लिविंग सोबत परिसर सुशोभीकरणाचा प्रकल्प, पोल्ट्री, शेळी फार्मिंग, ससा व हंस प्रकल्प, आणि विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि भौतिक उन्नतीत मोलाचे योगदान दिले. या सोहळ्यातच नवीन सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोककुमार देवंगरे यांचेही महाविद्यालयाच्या वतीने सप्रेम स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. देवंगरे म्हणाले की,
“ सांघिक पद्धतीने व सर्वांच्या सहकार्याने आपण संस्थेचा विकास साधण्याचा प्रयत्न करू.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राहुल सूर्यवंशी यांनी अत्यंत उत्तमरीत्या पार पाडले, तर आभारप्रदर्शन डॉ. महारुद्र सानप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विवेक खंडाईत आणि संपूर्ण प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉ. गायकवाड यांना भावपूर्ण निरोप दिला आणि डॉ. देवंगरे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या