चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर आणि भा. कृ. अनु. प. राष्ट्रीय मांस संशोधन संस्था, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर मार्फत अनुसूचित जाती या संवर्गातील पशुपालकासाठी उदगीर येथे आहार व्यवस्थापनातून किफायतशीर शेळी पालन व्यवसाय या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण व जागरूकता कार्यक्रम दिनांक 27 जुलै 2025 रोजी डाॅ. नंदकुमार गायकवाड, सहयोगी अधिष्ठाता पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. यामध्ये लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील दीडशे शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सुखदेव बारबुद्धे, संचालक, राष्ट्रीय मांस संशोधन संस्था, हैदराबाद यांच्या हस्ते आणि डॉ. अनिल भिकाने, माजी संचालक, विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर, डाॅ.नंदकुमार गायकवाड सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, डॉ. योगेश गाडेकर, वरिष्ठ संशोधक, राष्ट्रीय मांस संशोधन संस्था हैदराबाद, डॉ. अशोककुमार देवांगरे, प्राध्यापक आणि डॉ प्रफुल्लकुमार पाटील, प्रकल्प समन्वयक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रकल्प समन्वयक डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी प्रशिक्षणासाठी हा विषय निवडण्यामागचा उद्देश सांगितला आणि हे प्रशिक्षण चर्चात्मक व्हावे असे आवाहन केले. आपल्या मार्गदर्शनामध्ये पुढे बोलतेवेळी डॉ. सुखदेव बारबुद्धे यांनी शेळीपालनामध्ये गोठा व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन याचबरोबर आहार व्यवस्थापन या बाबी महत्त्वाच्या आहेत तसेच किफायतशीर शेळीपालन व्यवसाय होण्यासाठी शेळ्यांच्या उत्पादनाचे मूल्यवर्धन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड हे होते. पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. अनिल भिकाने यांनी शेळ्यांचे व्यवस्थापन, शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन, करडांची काळजी, आरोग्य व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन जंतनिर्मूलन, लसीकरण या सर्व बाबींचे महत्व विषद केले. डॉ. योगेश गाडेकर यांनी हे शेळीपालन प्रशिक्षण आयोजित करण्यामागचा उद्देश आणि त्या मागून काय साध्य व्हायला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करत असताना डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर मार्फत आयोजित करण्यात येणार्या विविध कार्यक्रम व सेवा याबाबत माहिती दिली तसेच या प्रशिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा वापर करून पशुपालकांनी आपला शेळीपालन व्यवसाय किफायतशीर करावा तसेच आपले कुटुंबाचे अर्थाजन वाढवावे असे प्रतिपादन केले. या प्रशिक्षणामध्ये शेळ्यांचे आहार व्यवस्थापन, शेळ्यांसाठी चारा उत्पादन, आझोला उत्पादन आणि त्याचा शेळ्यांच्या आहारात वापर, हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन तंत्रज्ञान, हिरव्या चाऱ्यापासून मुरघास निर्मिती इत्यादी विषयावर तज्ञाद्वारे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रशिक्षण हॉलमध्ये विविध चारा पिके, पशुखाद्य घटक तसेच आहारासंबंधीत बाबीचा स्टॉल उभारण्यात आला होता, त्याद्वारे सुद्धा उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. हा स्टॉल डॉ. गोपाळ भारकड, डॉ. शरद आव्हाड, डॉ. विवेक खंडाईत, डॉ. अनिल संगमे यांनी उभारला प्रशिक्षणा दरम्यान उपस्थित अनुसूचित जातीतील 150 पशुपालकांना कीटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सौ. मत्स्यगंधा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. राम कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रफुल्ल पाटील डॉ. राम कुलकर्णी, डॉ. मत्स्यगंधा पाटील, डॉ. लक्ष्मीकांत कोकाटे, डॉ. रवींद्र जाधव, डॉ. अशोक भोसले आणि विद्यार्थी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
0 टिप्पण्या