⭕सार्वजनिक आरोग्य सेवेचा आहेत कणा
⭕आरोग्य स्वयंसेविकांवर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कामाची जबाबदारी ??
मुंबई :( चक्रधर मेश्राम) :-एकीकडे मुंबईसह राज्यातील विविध भागात हिवताप आणि डेंग्युच्या साथीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला असताना सार्वजनिक आरोग्य सेवेचा कणा असलेल्या आरोग्य स्वयंसेविकांवर मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपविण्याचा घाट प्रशासनाकडून घालण्यात आला आहे. दुसरीकडे उच्च न्यायालयाने आरोग्य स्वयंसेविकांच्या बाजून दिलेल्या निर्णयानुसार त्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याऐवजी प्रशासनाने याप्रकरणी सर्वेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे या परिसरातील संतप्त झालेल्या तब्बत तीन हजारांहून अधिक आरोग्य स्वयंसेविकांनी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे काम करण्यास नकार दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी आरोग्य स्वयंसेविकांवर आहे. साथीच्या आजारांचा प्रदुर्भाव वाढू नये यासाठी वस्त्यांमधील घरोघरी जाऊन जनजागृती करणे, गरोदर माता, 0 ते पाच वर्षांच्या बालकांनी इंजेक्शन घेतली की नाही याची चौकशी करणे, त्यांच्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, क्षय रुग्णांचा शोध घेऊन ते औषधोपचार घेतात की नाही यावर लक्ष ठेवणे, कुटुंब नियोजनासाठी प्रचार-प्रसार करणे, त्याबाबतच्या साहित्याचा वापर करणे, ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पंतप्रधान आयुष्यमान कार्ड काढून देणे आदी विविध कामांची जबाबदारी आरोग्य स्वयंसेविकांवर सोपविण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात हिवताप आणि डेंग्युच्या साथीचा प्रादुर्भाव होत असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांविषयी जनजागृती करणे, कोणती काळजी घ्यावी याची माहिती देणे, डासांचा प्रादुर्भाव होत असलेल्या, तसेच डासांची उत्पत्ती स्थाने शोधणे आदी काम करण्यात आरोग्य स्वयंसेविका व्यस्त आहेत. एकूणच आरोग्य स्वयंसेविका मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवेचा कणा बनल्या आहेत. घरोघरी जाऊन आरोग्य सेवेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या आरोग्य सेविकांवर मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे काम सोपविण्याचा घाट घालण्यात आला आहे. मात्र कामगार न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही प्रशासनाने आरोग्य स्वयंसेविकांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेतलेले नाही.
उलटपक्षी याप्रकरणी प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे आरोग्य स्वयंसेविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. महापालिकेकडून आरोग्य स्वयंसेविकांना केवळ मासिक १४ हजार रुपये मानधन देण्यात येते. महापालिकेच्या कायम स्वरुपी कर्मचाऱ्यां इतकेच काम आरोग्य स्वयंसेविका करतात, मात्र निवृत्तीनंतर त्यांना कोणतेही लाभ मिळत नाहीत. महापालिकेकडून कायम सापत्न वागणूक मिळत असल्याने संतप्त झालेल्या आरोग्य स्वयंसेविकांनी निवडणुकीचे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीचे काम न केल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून दिला जात आहे. एकीकडे आरोग्य स्वयंसेविका महापालिकेच्या कर्मचारी नाहीत, तर मग त्यांच्यावर कारवाई कशी करणार, असा मुद्दा मुंबई मनपा आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश देवदास यांनी उपस्थित केला आहे. आरोग्य स्वयंसेविकांना निवडणुकीचे काम करण्याबाबतचे नेमणूक पत्र घेण्यास महापालिका अधिकारी बळजबरी करीत आहेत, असा आरोप ॲड. देवदास यांनी केला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्यात येईल, असा इशारा त्यानी दिला आहे.
0 टिप्पण्या