चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती - कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती आणि ग्रामीण युवा उद्योजकता प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात १३ आणि १४ ऑगस्ट रोजी शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, तसेच खेकडा आणि मच्छीपालन यांसारख्या शेतीपूरक व्यवसायांवर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
-ग्रामीण भागातील शेतकरी आणि तरुणांना केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता, आधुनिक तंत्रज्ञान आणि पूरक व्यवसायांचा आधार घेऊन आर्थिक प्रगती साधता यावी, हा या प्रशिक्षणामागचा मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या इच्छुकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. त्यामुळे, गरजू व्यक्तींना सरकारी मदतीने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल.या शिबिरामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि खेकडापालन या व्यवसायातील बारकावे, आधुनिक पद्धती, बाजारपेठेतील संधी आणि यशस्वी व्यवस्थापनाचे धडे देणार आहेत. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ९३७०५७८१७३ किंवा ९३२५३९२०२३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपाध्यक्ष शंभर. आश्लेषा एम. भोयर (जिवतोडे), सचिव श्री नागेश एन. पुनवटकर आणि संचालक ज्ञानेश्वर राजाराम डुकरे तसेच समस्त मंडळाने पुढाकार घेऊन या उपक्रमात युवकांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.ग्रामीण युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.
0 टिप्पण्या