चित्रा न्युज प्रतिनिधी
नाशिक :-महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या परिपत्रकानुसार आज दिनांक ८ ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:00 वाजता उद्योग संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमांचा शुभारंभ आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री माननीय श्री. मंगल प्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.
अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी मिळावी तसेच रोजगार क्षमतेत वाढ व्हावी व कौशल्य विकासाला चालना मिळावी हा शासनाचा उद्देश आहे. राज्यातील 400 शासकीय आय.टी.आय. व 130 शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये 2502 तुकड्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. 240 तासांच्या या अल्पमुदत अभ्यासक्रमाच्या उपक्रमाचे जवळपास 600 ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे. नवयुगीन व पारंपारिक अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या पहिल्या तुकडीचे उद्घाटन आज संपन्न झाले आहे. चालू शैक्षणिक वर्षात 75 हजार युवकांना प्रशिक्षण देणार असून पुढील वर्षी ही संख्या एक लाखापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. महिला उमेदवारांसाठी 364 विशेष तुकड्या तसेच उद्योजक क्षेत्रासाठी 408 विशेष तुकड्या सुरू करणार आहेत.
या अभ्यासक्रमामध्ये
1) तंत्रज्ञानावर आधारित:- ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ड्रोन तंत्रज्ञान,इलेक्ट्रिक व्हेईकल,सोलर एनर्जी
2) डिजिटल कौशल्ये:- सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशल इंटेलिजन्स, मोबाईल दुरुस्ती तंत्रज्ञ
3) नवीन क्षेत्रे:- ग्रीन हायड्रोजन,सोशल मीडिया इन्फ्युएंसर (social media infiuencer)
यासारख्या नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमाचे कौशल्ये मिळविण्याची संधी प्रशिक्षणार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
याप्रसंगी कौशल्य आधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळवण्याचे साधन नाही तर आत्मनिर्भरतेकडे नेणारी सतत चालणारी प्रक्रिया आहे असे सुतवाचन विभागाचे मंत्री माननीय मंगल प्रभाजी लोढा यांनी केले आहे. अल्पमुदतीच्या या रोजगारक्षम अभ्यासक्रमांच्या विविध कोर्स साठी प्रवेश घेण्यासाठी जवळच्या शासकीय आय.टी.आय. किंवा शासकीय तांत्रिक विद्यालयांशी संपर्क साधण्याचे आव्हान देखील त्यांनी या प्रसंगी केले.
ऑनलाइन उद्घाटनाच्या पश्चात शहीद जाट भगतसिंह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव येथे देखील विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी माननीय श्री. नाना पगार यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेशजी कवडे (बबी काका), नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नंदूभाऊ पाटील, नांदगाव तहसीलचे निवासी नायब तहसीलदार माननीय देवेंद्र कुऱ्हे,म.वि.प्र आय.टी.आय.चे प्राचार्य कैलास जाधव,सोमनाथ ठाकरे,पत्रकार महेश पेवाल, श्री.दत्तात्रय क्षीरसागर, संस्थेचे गटनिदेशक एम.डी. निकुंभ, कार्यालयीन अधीक्षक दीपक गावले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.आर.मढवई यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.एस. गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली.


0 टिप्पण्या