सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- जामखेड नगरपरिषद निवडणूक सध्या हाय-व्होल्टेज वातावरणात असून राज्यातील मोठ्या नेत्यांचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले गेले आहे. सभापती प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार हे प्रत्यक्ष गल्लोगल्ली फिरत प्रचारात जोर लावत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील शेळके यांच्या सभा पार पडल्या असून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमदार रोहित पवार यांच्या सभा होणार आहेत.
दरम्यान, प्रभाग क्रमांक 12 मधील चुंभळी येथे एका पक्षाचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी संबंधित गाडीचा पाठलाग करून दगडफेक करत गाडी फोडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणावर तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “जामखेडमध्ये दोन दिग्गज नेते असूनही शहराचा विकास थांबला आहे. रस्त्यांची अवस्था दयनीय, घाणीचे साम्राज्य, आठ–आठ दिवस पाणी नसलेली अवस्था — याला हेच नेते जबाबदार आहेत. धनशक्तीचा खेळ सुरू असला तरी आम्ही कामाच्या जोरावर निवडणूक जिंकू.”शहरात नवीन गाड्यांची ये-जा वाढल्याने त्या तपासाव्यात, अशीही मागणी त्यांनी केली.
ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे.आज पैसे वाटणारे उद्या वसुली करणार; त्यामुळे विकास होणार नाही. मतदारांनी घड्याळाच्या चिन्हाला साथ दिल्यास अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जामखेडचा कायापालट करू,” असे निमोणकर यांनी सांगितले.


0 टिप्पण्या