चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी अतुल जताळे यांच्या अध्यक्षतेखाली काल एक विशेष मार्गदर्शन सभा आयोजीत करण्यांत आली. या सभेला सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी निवडणुक निर्णय अधिकारी यांनी उपस्थित सर्वांना आदर्श आचार संहिता संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीदरम्यान आदर्श आचार संहिता लागू झाल्यानंतर कोणतेही नवीन शासकीय विकासकार्य सुरु करता येणार नाही. तसेच शासकीय यंत्रणा, वाहन इमारती, कर्मचारी किंवा निधीचा वापर राजकीय अथवा निवडणूकीच्या हेतूसाठी करणे पुर्ण निषिध्द आहे. तसेच निवडणूक कालावधीत काय करावे व काय करु नये या परिपत्रकाचे वाचन करुन उपस्थितांना त्याच्या प्रती पुरविण्यांत आल्या व आदर्श आचार संहिता निवडणुक घोषीत झाल्यापासुन ते निवडणूक निकाल लागेपावेतो राहील याची माहिती उपस्थितांना देण्यांत आली.त्यांनी पुढे सांगीतले की, निवडणुकीच्या काळात स्वच्छ, शांततापूर्ण व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविणे हे सर्व राजकीय पक्ष व उमेदवार यांची सामूहिक जबाबदारी आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारे प्रलोभन देणे, धार्मीक वा जातीय भावना भडकविणे अथवा गैरप्रकार करुन प्रचार करणे मतदारांना प्रलोभन देणे, समाजाच्या विविध घटकांमध्ये तणाव निर्माण करणे, वाहनांचा गैरवापर, दारु विक्री, मालमत्तेचे विद्रुपीकरण, ध्वनीवर्धकांचा वापर, सार्वजनिक सभा यामध्ये गैरप्रकार करुन प्रचार करणे या कृतीवर कायदेशीर कार्यवाही होईल असे त्यांनी सांगीतले.
या सभेत नामनिर्देशन प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, निवडणूक खर्च नोंदवही, तसेच प्रचार नियमावली या बाबीचेंही सविस्तर स्पष्टीकरण करण्यांत आले. सर्व उपस्थितांना निवडणूक कार्यक्रमाचे वाचन करुन त्याच्या प्रती उपलब्ध करुन दिल्या. तसेच अनामत रक्कम, शपथपत्रे व घोषणापत्राबाबतची माहिती देण्यांत आली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विविध शंका विचारल्या असून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे निराकरण केले.याप्रसंगी भद्रावती नगर परिषदेचे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ विशाखा शेळकी, गिरीष बोरडे, अति. सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा नायब तहसिलदार वरोरा, तसेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.


0 टिप्पण्या