Ticker

6/recent/ticker-posts

अंनिस जिल्हा अध्यक्ष डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या हस्ते ‘अंनिप’च्या वार्षिक अंकाचे प्रकाशन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
कोल्हापूर :-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिके’चा नोव्हेंबर–डिसेंबर महिन्यांचा जोड अंक हा वार्षिक अंक म्हणून प्रकाशित केला जातो. २०२५ च्या वार्षिक अंकाचे प्रकाशन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या हस्ते व जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रवीण चौगले यांच्या उपस्थितीत चित्रदुर्ग मठ, दसरा चौक, कोल्हापूर येथे पार पडले.
यावेळी बोलताना डॉ. हिर्डेकर म्हणाले की, कोणत्याही चळवळीसाठी तिचे मुखपत्र ही अत्यावश्यक गरज असते. संघटनेचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य चळवळींच्या मुखपत्रांच्या माध्यमातून होत असते. आज एका बाजूला मोठा वैचारिक वारसा असलेली अनेक नियतकालिके लोकांच्या सहभाग व पाठिंब्याअभावी बंद पडतील की काय अशी स्थिती असताना, ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’सारखे महत्त्वाचे मासिक सातत्याने व दिमाखदारपणे कार्यरत राहणे ही अभिमानाची बाब आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचा अनुभव असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या कामाची परिणामकारकता, अनुभव, विचार व कृती कार्यक्रम समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी लिहिते होऊन अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचा प्रभावी वापर केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेसाठी देणगी व जाहिराती देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आभार मानले. सध्या या पत्रिकेचे महाराष्ट्रात सात हजारांहून अधिक वर्गणीदार असून, येत्या वर्षात ही संख्या पंधरा हजारांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट संघटनेने ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी झटून प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष डॉ. प्रवीण चौगले, जोडीदाराची विवेकी निवड विभागाच्या राज्य कार्यवाह रेश्मा खाडे, युवा सहभाग विभागाचे राज्य सहकार्य हरी आवळे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद शिंदे, जिल्हा प्रधान सचिव रामदास देसाई, कोल्हापूर शहर कार्याध्यक्ष स्वाती कृष्णात, करवीर शाखा कार्याध्यक्ष संघसेन जगतकर, आजरा शाखा प्रधान सचिव संजय घाटगे यांच्यासह कपिल मुळे, दिलीप कांबळे, राहुल शिंगे, महेश ओलेकर, मानसी बोळूरे, राहुल सुतार, निशांत शिंदे, तनिष्क जगतकर, रिया मुळे, वेद मुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या